अकोले भाजपची ‘आरपीआय’बाबत केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार! तालुक्यात सातत्याने भाजपविरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप
नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यात राजकीय घमासान सुरू असतानाच अकोले तालुक्यातही राजकीय हेवेदावे सुरू असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आर.पी.आय. – आठवले गट) नेते व कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नेहमी भूमिका घेत असून ते पक्षाची बदनामी करत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
सदर पत्रात भांगरे यांनी म्हटले की, केंद्रात भाजप व आर. पी. आय. (आठवले गट) यांची आघाडी असून आपण केंद्रात मंत्री आहात. मात्र, आपल्या अकोले तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व नेते हे तालुक्यातील भाजपच्या विरोधात नेहमी भूमिका घेत असून ते भाजपची व नेत्यांची बदनामी करत असतात. अशीच बदनामी आपले कार्यकर्ते व नेते करत राहणार असाल तर उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपणास शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यास आम्ही आपला प्रचार कसा करायचा? असा सवालही विचारला आहे.
तसेच यापूर्वीही आपणाकडे याबाबत पत्रव्यवहार केलेला असून आपण त्याची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. सध्या अकोले अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तरी आपण आपल्या पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांना योग्य ती समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी सांगितले. या पत्राची प्रत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आर.पी.आय. प्रदेशाध्यक्ष राहुल आहेर, आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष, भाजपचे संघटन मंत्री, संघटन मंत्री भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा, आर. पी. आय. तालुकाध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड यांना पाठविले आहे.