‘एलसीबी’च्या नियुक्तीला झाले राजकीय संक्रमण! संगमनेर तालुका वगळता उर्वरीत तीन पोलीस ठाण्याचे निरीक्षकही ‘वेटींग’वर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडते याबाबतचा निर्णय अद्यापही ‘गुलदस्त्यात’ आहे. या जागेसाठी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पाच पोलीस निरीक्षकांसह जिल्ह्या बाहेरुन आलेल्या एका निरीक्षकाने पूर्ण ताकद लावल्याचेही बोलले जाते. त्यातच आता या अर्धा डझन अधिकार्यांनी आपले राजकीय ‘वजन’ही पणाला लावल्याची चर्चा सुरु झाल्याने ‘एलसीबी’च्या नियुक्तीला राजकीय संक्रमण झाल्याचेही समोर आले आहे. यासर्वांवर मात करुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील मुख्यालयातील प्रतिष्ठेची ही खुर्ची कोणाच्या ताब्यात देतात याबाबत पोलीस दलासह सामान्यांनाही उत्सुकता लागली आहे.
यंदा कोविडच्या संसर्गामुळे प्रशासकीय बदल्यांचा खोळंबा झाला. त्यानंतर सप्टेंबरपासून धिम्यागतीने ही प्रक्रिया सुरु झाली. मात्र ती अद्यापही अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. बदल्यांची प्रक्रिया अधिक लांबल्याने दरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींनी काही पोलीस निरीक्षकांचा या स्पर्धेतून परस्पर पत्ता कटही झाला आहे. एलसीबीसह जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांच्याही बदल्या खोळंबल्याने प्रतीक्षेत असलेले निरीक्षक अजूनही देव पाण्यात बुडवून बसले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची पुणे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी आपल्या नावाची फिल्डींग लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची काम करण्याची धाटणीच जिल्ह्याला समजली नसल्याने घोड्यावर बसलेल्या अनेक निरीक्षकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जिल्ह्याबाहेरुन पाठविलेल्या चार निरीक्षकांची भर पडल्याने जिल्ह्यातील निरीक्षकांची घालमेल वाढली आहे.
सद्यस्थितीत राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, शेवगावचे निरीक्षक रामराव ढिकले, शिर्डी वाहतूक शाखेचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे, कोपरगावचे निरीक्षक राकेश माणगावकर, संगमनेरचे निरीक्षक अभय परमार व नाशिक ग्रामीणमधून पुन्हा जिल्ह्यात आलेले संपत शिंदे गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने या स्पर्धेत सुरुवातीपासून अग्रक्रमी असलेल्या पोलीस निरीक्षक परमार यांचे नाव यादीतून अदृष्य झाले आहे.
कोपरगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर नगरमध्ये कार्यरत असतांना गांजा तस्करांशी कथित संबंधावरुन मोठे आरोप झाले होते. त्यातून त्यांना निलंबनाचाही सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंदी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा यापूर्वी अनुभव असलेले व काही वर्षांपूर्वी जिल्ह्याबाहेर गेलेले पो.नि.संपत शिंदे यांची नाशिकच्या विशेष महानिरीक्षकांनी विनंतीवरुन जिल्ह्यात बदली केली आहे. त्यांच्यावर एलसीबीची जबाबदारी सोपविल्यास थेट नाशिकवरील संशय बळावण्याची शक्यता असल्याने त्यांच्या नावावरही शिक्कामार्तब होण्याची शक्यता कमीच आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, शिर्डीचे नितीनकुमार गोकावे व शेवगावचे रामराव ढिकले अद्यापही स्पर्धेत असून या तिघांतूनच एकाची वर्णी लागण्याची शक्यता पोलीस दलातूनच व्यक्त होत आहे. मात्र एलसीबीच्या निरीक्षकांच्या नियुक्तीचा सर्वाधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांचा असल्याने व आत्तापर्यंतच्या त्यांच्या येथील छोट्याशा कारकीर्दीतूनही त्यांच्या कामाची हातोटीतून डागाळलेल्या अधिकार्यांची नियुक्ति होण्याची शक्यता दुर्मीळ असल्याने गुन्हे शाखेची बाजी कोण मारील याबाबत आजही कोणी शाश्वत सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. स्पर्धेत असलेल्या सर्वच निरीक्षकांनी आपले राजकीय वजनही पणाला लावले असून एलसीबीच्या नियुक्तीला राजकीय संक्रमण झाल्याचे दिसत असले तरीही पोलीस अधीक्षक ते झुगारण्याचीच शक्यता अधिक आहे.
एलसीबीसह संगमनेर तालुक्यातील शहर, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या नियुक्त्याही खोळंबल्या आहेत. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यासाठी तालुक्याचे निरीक्षक सुनील पाटील यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी नको तिथे डोके लावून ‘दादां’चा रोष ओढावून घेतला आणि थेट नियंत्रण कक्ष गाठले. त्यामुळे एलसीबीसह जिल्ह्यातील सर्वाधिक महत्वाचा तालुका असलेल्या संगमनेरातील तीन पोलीस ठाण्यांच्या प्रभारींच्या बदल्या खोळंबल्या असून येथील प्रभारी अधिकारी ‘वेटींग’वर आहेत.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार सुरुवातीपासून ‘एलसीबी’च्या स्पर्धेत आघाडीवर होते. त्यासाठी त्यांनी ‘मोठे’ राजकीय वजनही पाठी ठेवले होते. मात्र त्यांच्याच पोलीस ठाण्यातील राणा परदेशी नावाच्या उपनिरीक्षकांनी त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले, त्यामुळे आता त्यांना जिल्ह्यातील एखादे पोलीस ठाणेही मिळते की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या ते एका मंत्र्याला दररोज मुजरे घालीत असून येथील कार्यकाळ सहा महिने वाढवून मिळवण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत.