दरोडेखोरांच्या अटकेसाठी पत्रकार संघाच्या जिल्ह्याध्यक्षांनाच उपोषणाची पाळी! सोनई पोलीस ठाण्याचा गलथान कारभार; शेतातील उभ्या गव्हावर दरोडा घालणार्यांना अभय..

नायक वृत्तसेवा, नेवासा
दीड महिन्यांपूर्वी शेतात उभ्या असलेल्या गव्हाच्या पिकाची हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने चोरी करणार्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल होवूनही अद्याप त्यातील कोणालाही अटक झालेली नाही. विशेष म्हणजे सदरची घटना ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या शेतात घडली होती. दिवसाढवळ्या यंत्राचा वापर करुन झालेल्या या संपूर्ण प्रकरणाचे त्यांनी मोबाईलवर छायाचित्रणही केले होते व चोरीचा प्रकार सुरू असतानाच सोनई पोलिसांनी छापाही घातला होता. मात्र या घटनेला दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सोनई पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून या गुन्ह्यात वापरलेली यंत्रसामग्रीही ताब्यात घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नवगिरे यांना सोनई पोलीस ठाण्यासमोर आपल्या मुलांसह उपोषण करण्याची पाळी आली आहे. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी जर पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षांनाच संघर्ष करावा लागत असेल तर सामान्य माणसांची काय अवस्था असेल?. यावरुन सोनईसह जिल्हा पोलीस दलातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून अनेक वर्षांपासून फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्याचा बातम्या प्रसिद्ध करुन पाठ थोपटून घेणार्या स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील आरोपींचा मागमूस लागत नसल्याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.

नेवासा तालुक्यातील पानेगाव शिवारात राहणार्या बाळासाहेब नवगिरे यांच्या शेतातून दीड महिन्यांपूर्वी 13 एप्रिल रोजी संतोष मच्छिंद्र नवगिरे, संपत अशोक मते व इतर आठ जणांनी हार्वेस्टर यंत्राचा वापर करुन उभे गव्हाचे पीक कापून नेण्याची घटना घडली होती. सदरचा प्रकार सुरू असताना नवगिरे यांनी संबंधितांना रोखण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांनी दांडगाई करीत त्यांचा विरोध मोडून काढला. या दरम्यान नवगिरे यांनी आपल्या मोबाईलवर या सर्व घटनेचे चित्रीकरण करीत सोनई पोलिसांना माहिती दिली, मात्र त्यांच्याकडून तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन करुन मदत मागितली.

त्यानंतर काही वेळातच सोनई पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदरचा प्रकार रोखला. मात्र त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असता, नवगिरे यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क केल्यानंतर सोनई पोलिसांनी वरील दहा जणांवर भा.दं.वि. कलम 395 (दरोडा), 379 (चोरी) यासह अपमानकारक वागणूक देवून क्रोधास कारण ठरल्याचे कलम 504 व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र तत्कालीन सहाय्यक निरीक्षक बागुल यांनी आरोपींशी संगनमत केल्याने इतक्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल होवूनही गेल्या दिड महिन्यात सोनई पोलिसांना ना आरोपी गजाआड करता आले, ना या दरोड्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री जप्त करता आली. त्यामुळे सहाय्यक निरीक्षक बागुल यांची गुन्हेगारांना पोषक असलेली प्रवृत्तीही ठळकपणे समोर आली.

या सर्व घटनाक्रमातून मनोबल वाढलेल्या वरील दहाही आरोपींनी या प्रकारानंतरही नवगिरे यांना धमकावण्याचा उद्योग सुरुच ठेवला. या दरम्यान नवगिरे यांच्यावर दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठीही दबाव टाकण्यात आला, त्यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. याची माहिती त्यांनी वेळोवेळी सोनई पोलिसांना दिली. याबाबत तेथील पोलीस ठाण्यात संबंधितांवर अदखलपात्र गुन्ह्याची (एन.सी.) नोंदही करण्यात आली. मात्र त्याउपरांतही आजवर आरोपींना अटक झालेली नाही व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कोणतीही यंत्रसामग्री हस्तगत केली गेली नाही. त्यावरुन सोनई पोलिसांनी आरोपींशी संगनमत केल्याचेही स्पष्ट दिसत आहे.

वरील सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून यापूर्वी त्यांच्यावर दोन गंभीर गुन्ह्यांसह तब्बल डझनभर अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस कारवाईच करीत नसल्याने सध्या यासर्व आरोपींचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पत्रकार नवगिरे व त्यांच्या कुटुंबाला वारंवार धमक्या दिल्या जात असून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेता त्यांच्याकडे बेकायदा पिस्तूल असण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे नवगिरे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून एकतर सर्व आरोपींना गजाआड करावे करावे किंवा निःशुल्क पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र त्याहीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आज (ता.4) सकाळी 11 वाजता बाळासाहेब नवगिरे हे आपला मुलगा सुजीत (वय 15) व मुलगी प्राजक्ता (वय 13) यांच्यासह सोनई पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मागील दोन वर्षांपासून संबंधित आरोपी आमच्या जमीनीतील उभी पीक चोरुन नेत असून त्यामुळे आमच्या कुटुंबाचा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. आमचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून आमची पीक राजरोस चोरीला जात असल्याने आमची आर्थिक परवड होत असून शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाल्याचे सुजीत व प्राजक्ता नवगिरे यांनी दैनिक नायकशी बोलताना सांगितले.

गेल्या काही दिवसांत दोन-दोन दशकांपासून फरार असलेल्या आरोपींच्या शोधाच्या एकामागून एक बातम्या प्रसिद्ध करुन अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा आपली पाठ थोपटून घेण्यात मश्गुल आहे, मात्र मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेवासा तालुक्यातील एका शेतकर्याची व्यथा मात्र त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसत आहे. यावरुन जिल्हा पोलीस दलातील अनागोंदी आणि ठिकठिकाणच्या पोलीस प्रभार्यांची मनमानीच अधिक स्पष्टपणे दिसत असून सामान्य माणसांपासून न्याय दुरावला असल्याचे भयानक चित्र पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्या प्रकरणातून दिसू लागले आहे.

दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्याकडून सोनई पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल यांनी पाच पोती गव्हाची मागणी केली होती. मात्र त्यांनी सत्याच्या तपासाला चिरीमिरी कशाला असे म्हणतं ते देण्यास नकार दिल्याने गेल्या दीड महिन्यापासून ‘त्या’ आरोपींचा केसही वाकडा झालेला नाही, मात्र त्यांच्याकडून पीडित शेतकर्यालाच धमक्या देण्याचे सत्र मात्र अव्याहत सुरू आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या सर्व आरोपींकडे गावठी कट्टे असण्याची शक्यता असल्याने नवगिरे यांनी पोलीस अधीक्षकांकडून निःशुल्क पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे, मात्र त्यांनी अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

