संगमनेरात महसूल सप्ताहाच्या उद्देशालाच हरताळ! शासनाच्या हेतुला केराची टोपली; केवळ वरीष्ठांसमोर घडली चमकोगिरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

राज्य शासनाकडून जनसामान्यांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांची नागरीकांना माहिती व्हावी, त्यातून लाभार्थ्यांची संख्या वाढावी, महसूल विभागाकडून देण्यात येणार्‍या नागरी सेवांचा नागरीकांना जास्तीतजास्त लाभ व्हावा यासह संपूर्ण महसूली वर्षात प्रामाणिकपणे सेवा बजावणार्‍या आणि उद्दिष्ट प्राप्त करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव व्हावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी ऑगस्टचा पहिला आठवडा राज्यात ‘महसूल सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. शासनाच्या योजना आणि महसूलच्या सेवा अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची व्यापक जनजागृती करुन त्यात नागरी सहभाग वाढवावा असा शासनाचा उद्देश आहे. मात्र संगमनेरच्या महसूल विभागाने शासनाच्या या उद्देशालाच हरताळ फासला असून नागरी सहभागाशिवाय केवळ वरीष्ठांसमोर चमकोगिरी करण्यातच सप्ताहातील पाच दिवस घालवले आहेत. शुक्रवारी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही बाब स्पष्टपणे समोर येवूनही वरीष्ठांनी त्यावर साधलेली ‘चुप्पी’ही आश्‍चर्यजनक ठरली आहे. त्यावरुन महसूल सप्ताह नागरीकांच्या सोयीसाठी की अधिकार्‍यांच्या असाही सवाल उपस्थित झाला आहे.

महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्यावेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख उद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसा पाठवणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे, महसूली वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अशी नियमित कामे वेळच्यावेळी करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार व महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ‘महसूल दिना’चे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात प्रत्येक दिवशी समाजातील विविध घटकांतील नागरीकांसाठी मोहीमा, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे व महसूल अदालत सारखे कार्यक्रम घेतले जाणे शासनाला अभिप्रेत आहे.

या सप्ताहाचा मंगळवारी (ता.1) राज्यासह जिल्ह्यातही शुभारंभ झाला. राज्य शासनाच्या आदेशानुसार या सप्ताहात बुधवारी ‘युवा संवाद’, गुरुवारी ‘एक हात मदतीचा’, शुक्रवारी ‘जनसंवाद’, शनिवारी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, रविवारी ‘विभागातील सेवा निवृत्त कर्मचार्‍यांशी संवाद’ आणि सोमवारी (ता.7) सप्ताहाची सांगता अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले होते. या सप्ताहाच्या अनुषंगाने चार ते पाच दिवस आधीपासूनच सप्ताहाची रुपरेषा, कार्यक्रमाचे स्वरुप, वेळापत्रक, शासनाच्या विविध योजना नागरीकांसाठी कशा लाभदायी आहेत हे अधोरेखीत करुन प्रसिद्धीपत्रक तयार करुन त्याचे वितरण करावे. तसेच, कार्यक्षेत्रातील आघाडीची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व सोशल माध्यमातून कार्यक्रमाचा व्यापक प्रचार करावा. या कार्यक्रमांच्या आयोजनापूर्वी, आयोजनादरम्यान व आयोजनानंतर व्यापक प्रसिद्धीसाठी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे.

महसूल विभाग, जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे या विभागामार्फत विविध शासकीय योजनांची माहिती देणार्‍या लघुचित्र फिती तयार करुन त्या माध्यमांद्वारे प्रसारीत करणे. सप्ताहाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विविध दाखले, योजना, शिष्यवृत्त्या आदींची माहिती व दाखल्यांचे वितरण करणे, निसर्गाच्या तडाख्याने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना आधार देवून त्यांना मदतीचा हात देणे, पीकविमा योजनेची माहिती देणे, आपत्तीबाबत जनजागृती करणे, पुनर्वसनाबाबतच्या अडचणी सोडवणे, दुर्गम भागात महसूल अदालत घेणे, ‘आपले सरकार’ची दखल घेणे, सैनिकांसाठी विशेष उपक्रम राबवणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांशी संवाद साधणे अशा सर्वसामान्यांशी निगडीत अनेक बाबींचा या सप्ताहात समावेश आहे. त्याची जिल्हाधिकार्‍यांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागात अंमलबजावणी व्हावी असे शासनाला अपेक्षीत आहे.

संगमनेरच्या महसूल विभागाने मात्र शासनाच्या या अपेक्षांनाच केराची टोपली दाखवली असून संगमनेरात महसूल सप्ताहासारखा कार्यक्रम होतोय याची तालुक्याला माहितीच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या कालावधीत नाहक ‘त्रास’ टाळून दाखले देण्याची सुविधा असतांनाही महसूल कार्यालयात त्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र नाही. शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न सोडवणेही या सप्ताहात अंतर्भूत असूनही प्रांताधिकारी अथवा तहसील कार्यालयात सामान्य गर्दी असल्याचे दिसून येते. या सप्ताहाबाबत उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे व तहसीलदार धीरज मांजरे यांनी माध्यमांसह सर्वसामान्यांनाही माहिती होईल अशी कोणतीही तजबीज केली नाही. त्यामुळे संगमनेरचा महसूल सप्ताह अधिकार्‍यांनी फक्त चमकोगिरीपूरताच राबविल्याचेही स्पष्टपणे दिसून आले आहे.

याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शुक्रवारी महसूलचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे दोघेही संगमनेरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय भवनात अधिकारी व कर्मचार्‍यांचा कोडकौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला तुरळ शेतकरी आणि लाभार्थी वगळता महसूलच्या कर्मचार्‍यांचाच अधिक भरणा होता. विशेष म्हणजे पाच दिवस लोटलेल्या या सप्ताहात जनतेशी नाळ जुळलेला एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा पुढारी महसूलच्या परिसरात आढळला नाही. या कार्यक्रमानंतर संगमनेर महाविद्यालयात जिल्हाधिकार्‍यांनी युवकांशी संवाद साधला. वास्तविक शासन आदेशानुसार हा कार्यक्रम बुधवारीच होणे अपेक्षीत होते. यावरुन संगमनेरच्या महसूल विभागाने राबवायचा म्हणून राबवल्याचे दिसत असून अधिकार्‍यांनी चक्क शासनाच्या उद्देशांनाच हरताळ फासला आहे.

Visits: 26 Today: 2 Total: 115323

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *