खंदरमाळवाडी येथील मुलांनी साकारली पन्हाळ गडाची प्रतिकृती
खंदरमाळवाडी येथील मुलांनी साकारली पन्हाळ गडाची प्रतिकृती
नायक वृत्तसेवा, घारगाव
दिवाळीची सुट्टी म्हणलं की मुलं सुट्टीचा मनमुराद आनंद घेतात. मात्र संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील मुलांनी गेल्या पाच वर्षांपासून किल्ले बनविण्याचा छंद जोपासला आहे. अवघ्या दोन दिवसांत या मुलांनी हुबेहुब पन्हाळगडाची अतिशय सुंदर प्रतिकृती साकारली आहे. आता या गडाचे देखणे रुप बघण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे.

खंदरमाळवाडी येथील शेतकरी संपत लेंडे यांची मुले अजिंक्य व रोहित यांना पहिल्यापासूनच किल्ले बनविण्याची आवड आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघेही बंधू दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरासमोर किल्ला बनवतात. त्यासाठी त्यांना चुलत भाऊ व बहीण रोहित, गौरी, प्रतीक, सुजल हे सर्वजण मदत करतात. अवघ्या दोन दिवसांत त्यांनी घरासमोरील पटांगणात पन्हाळ किल्याची अतिशय सुंदर प्रतिकृती साकारली आहे. गडावर जाण्यासाठी मावळ्यांना वाट, गडावरील पहारेकरी हे सगळे हुबेहुब बनवले आहे. विशेष बाब म्हणजे या मुलांनी या गडाला आकर्षक विद्युत रोषणाईही केली आहे. आता किल्ल्याचा नजारा डोळ्यांत साठविण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे.

शाळेमध्ये असतानाच गडकिल्यांची आवड निर्माण झाली होती. तेव्हा पासूनच विविध किल्ले बनवण्याचा छंद लागला. गेल्या पाच वर्षांपासून मी विविध गडकिल्यांची प्रतिकृती बनविल्या आहेत. यावेळेसही अवघ्या दोन दिवसांत पन्हाळ गड किल्ल्याची अतिशय सुंदर हुबेहुब प्रतिकृती बनविली आहे.
– अजिंक्य लेंडे (किल्ला बनविणारा मुलगा)

