एकामागून एक कारवायांनंतरही गुटखा नियंत्रणात येईना! आता पोलीस उपअधीक्षकांचा छापा; सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीला पूर्णतः बंदी असतानाही राजरोसपणे सर्वत्र उपलब्ध असलेला गुटखा वारंवार कारवाया होवूनही पोलीस व अन्न-भेसळ प्रशासनाला नियंत्रणात आणता येईना. त्यामुळे राज्यात गुटखा तस्करीची पाळेमूळे किती खोलवर रुजली आहेत याचा प्रत्यय येतो. हे सिद्ध करणारा प्रकार रविवारी सायंकाळी शहरातील कत्तलखान्यांचा परिसर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या भारतनगर भागातून समोर आला असून पोलिसांनी चक्क मोपेडवरुन बिनधास्त तीन गोण्या भरुन जाणार्‍या गुटखा तस्कराला अटक करीत त्याच्याकडून मब्बल 1 लाख 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईने संगमनेरच्या गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असली तरीही शहरातील गुटखा विक्रीवर मात्र त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आलेला नाही.

याबाबत संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भारतनगर परिसरातील एक इसम मोठ्या प्रमाणात गुटखा घेवून येणार असल्याची गुप्त माहिती उपअधीक्षक राहुल मदने यांनी समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, अमृत आढाव व प्रमोद गाडेकर यांना बोलावून आवश्यक त्या सूचना देत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने भारतनगर परिसरात खासगी वाहनाने जात सापळा रचला व मिळालेल्या माहितीनुसारच्या वर्णनाच्या मोपेडचा शोध सुरु केला.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याच भागात एक इसम पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने काळ्या रंगाच्या मोपेडवरुन पाठीमागे तीन गोण्या बांधून येत असल्याचे पथकाला दिसले. मिळालेल्या वर्णनानुसार हिच व्यक्ती असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यासह वाहनाची तपासणी करायची असल्याचे सांगताच तो त्याला विरोध करु लागला, त्यामुळे संशय बळावलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता त्याच्या मोपेडवर बांधलेल्या दोन पांढर्‍या व एका पिवळ्या रंगाच्या गोण्यांमध्ये हिरा पान मसाल्याचे 210 पॅकेट व रॉयल कंपनीची 210 पाकीटे असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा बंदी असलेला गुटखा आणि 1 लाख रुपये किंमतीची काळ्या रंगाची मोपेड (क्र.एम.एच.17/सी.टी.7486) असा एकूण 1 लाख 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पो.कॉ.सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी अबरार सलीम शेख (वय 27, रा.भारतनगर) याच्यावर भा.दं.वि. कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006च्या अधिनियमाचे कलम 59, 26 (2), (4) नुसार त्याला अटक करण्यात आली आहे. या कावाईने संगमनेरच्या गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली असली तरीही त्याचा कोणताही परिणाम संगमनेरातील गुटखा विक्रीवर दिसून आला नाही. या कारवाईनंतरही शहरात सर्वत्र राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याचेही दिसून आले आहे. यावरुन जिल्ह्यातील गुटखा तस्करी पोलीस आणि अन्न व प्रशासन विभागाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23153

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *