पाळणा दुर्घटनेतील किशोर साळवेंची मृत्यूशी झुंज अपयशी शिर्डी परिसरावर पसरली शोककळा; नागरिकांतून व्यक्त होतेय हळहळ


नायक वृत्तसेवा, शिर्डी
रामनवमी यात्रेवेळी पाळणा दुर्घटनेतील जखमी झालेल्या किशोर साळवेंची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून त्यांनी नाशिक येथील रुग्णालयात गुरुवारी (ता.27) पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.

30 मार्च रोजी शिर्डी येथे रामनवमी उत्सवानिमित्त विविध प्रकारचे पाळणे दाखल झाले होते. रामनवमी यात्रेला विशेष महत्त्व असल्यामुळे नागरिक व भाविक यात्रा पाहण्यासाठी गर्दी करतात. तसेच नागरिक आपल्या कुटुंबासमवेत या यात्रेचा आनंद घेण्याकरिता येतात. अशाचप्रकारे 1 एप्रिल रोजी सायंकाळी शिर्डीतील किशोर पोपट साळवे वय (35) हे आपल्या पत्नी ज्योती साळवे व मुलगी पाळण्यात आनंद घेण्यासाठी आले होते.

परंतु दुर्दैवाने अचानकपणे ब्रेक डान्स करणार्‍या पाळण्याची दुर्घटना घडून या दोन्ही दाम्पत्यांना यात मोठी इजा झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल केले. परंतु किशोर साळवे यांच्या दोन्ही पायाला तसेच त्यांची पत्नी ज्योती यांच्या एका पायाला मोठ्या प्रमाणात जखम होऊन रक्तस्राव होत असल्याने त्यांना नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करून त्यांचे दोन्ही निकामी झालेले पाय तात्काळ शस्त्रक्रिया करून काढून टाकले व त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला.

तसेच त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या एका पायाचा पंजा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. त्यांच्या पायावर देखील दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने शिर्डी शहरातील स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध संघटनांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जवळपास 22 लाख रुपये हॉस्पिटलचे बिल माफ करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने गुरुवारी पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची वार्ता शिर्डी परिसरात पसरताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.


शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेची सर्वस्व जबाबदारी ही पाळणा मालकाची असून शासनाने यात लक्ष घालून यास जबाबदार असलेल्या पाळणा मालकाकडून 25 लाखांची आर्थिक मदत साळवे कुटुंबियांना मिळून द्यावी.
– कमलाकर कोते (जिल्हाध्यक्ष-शिवसेना)

Visits: 15 Today: 1 Total: 114590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *