थोरात कारखान्याकडून दिवाळीसाठी 26 कोटी ः थोरात सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या 56 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अत्यंत काटकसर आणि पारदर्शकतेतून संगमनेरच्या सहकाराची लौकिकास्पद यशस्वी वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप करताना कारखान्याने कर्जफेडी बरोबर ऊस उत्पादकांना चांगला भाव दिला आहे. दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी 176 रुपये ऊस प्रोत्साहनपर अनुदान देण्याबरोबर या दिवाळीसाठी ऊस उत्पादक व कामगारांसाठी एकूण 26 कोटी रुपये बाजारात येणार असल्याची घोषणा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, कांचन थोरात, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, अ‍ॅड. माधव कानवडे, लक्ष्मण कुटे, इंद्रजीत थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर कारखान्याचा कारभार सुरू आहे. अत्यंत जिज्ञासूपणे व काटकसरणे कुटुंबाप्रमाणे या कारखान्याचा कारभार चालतो आहे. त्यामुळे देशपातळीवर कारखान्याचा वेळोवेळी गौरव झाला आहे. मागील वर्षी 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप केले आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176 रुपये प्रतिटन बँकेत वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे 2626 रुपये भाव प्रतिटन मिळणार आहे. हे अतिरिक्त अनुदान 14 कोटी रुपये ठेवींवरील व्याज 2 कोटी रुपये आणि कारखान्याच्या कामगारांचा बोनस 10 कोटी रुपये असे एकूण 26 कोटी रुपये कारखान्याच्यावतीने बाजारात येणार आहेत.

निळवंडे कालव्यांच्या कामाला आपण कायम गती दिली. या दिवाळीच्या पाडव्याला पाणी कालव्यांद्वारे आणायचे आपले स्वप्न होते. परंतु सरकार बदलामुळे गती मंदावली आहे. मात्र आता हे पाणी कोणीही थांबवू शकणार नाही. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून सरकारने घोषणेऐवजी थेट शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहोचवावी. तसेच उसाचे एकरी उत्पादन वाढवावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, 15 लाख 53 हजार मेट्रिक टन गाळपाबरोबर 65 कोटींची वीज विक्री कारखान्याने केली असून पन्नास लाख लिटरचे इथेनॉल उत्पादन केले आहे. हवामानामुळे काही भागांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यावर प्रतिबंध करण्यासाठी कारखान्याच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

याप्रसंगी विष्णूपंत रहाटळ, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, प्रमिला अभंग, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, राजेंद्र चकोर, विलास वर्पे, आर. बी. रहाणे, शांताराम कढणे, संचालक गणपत सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, सुधाकर रोहोम, मीरा वर्पे, रामदास वाघ, संभाजी वाकचौरे, किरण कानवडे, भास्कर पानसरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

राजहंसकडून एक रुपया रिबेट..
ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणार्‍या राजहंस दूध संघाने कोरोना संकटात शेतकर्‍यांना मोठी मदत केली आहे. दूध संघाकडून सर्वाधिक 35 रुपये लिटर भाव दिला जात असून 16 ऑक्टोबर 2022 पासून प्रतिलिटर 36 रुपये प्रतिलिटर दर देण्यात येणार आहे. या दिवाळीनिमित्त प्रतिलिटर एक रुपये प्रमाणे रिबेट देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

Visits: 15 Today: 2 Total: 116357

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *