नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच सांधेरोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च येतो, हा खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असतो. सर्वसामान्यांना हा खर्च पेलवतही नाही. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत सांधेरोपण शस्त्रक्रियेचा समोवश करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी खुर्द येथील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहेत. रुग्णांचे निकामी झालेले सांधे बरे होऊन त्यांच्या आयुष्याला पूर्ववत आकार मिळणार असल्याची माहिती एसएमबीटी हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

संधीवातामुळे अनेकांना सांधेदुखीचा अधिक त्रास जाणवायला लागतो. शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर ते सांध्यांमध्ये साचते. अधिक प्रमाणात श्रम, ताप, विषाणू, आजार, अशक्तपणा, सांध्यावर अधिक ताण पडणे अशाही काही कारणांनी सांधेदुखी होते. योग्य उपचारांसाठी सांधेदुखीच्या मुळ कारणाचे निदान होणे आवश्यक असते. सांधेदुखी हा केवळ उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता वैद्यकीय तपासणी न करता काहीजण वेदनाशामक गोळ्या घेतात असे केल्यास भविष्यात गंभीर आजारांना समोरे जावे लागू शकते.

एका गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी साधारण 1 लाख व दोन्हींसाठी 2 ते अडीच लाख खर्च होतो. तेच मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये सामान्यतः 3 लाखांहून अधिक खर्च होतो. याच कारणामुळे अनेकदा वयोवृद्ध लोक वेदना सहन करतच आपले शेवटचे क्षण जगतात. पण सांधेदुखी ही सहन करण्यासाठी नाही, ते मोफत उपचार करण्यासाठी आहे असे शासनाचे ध्येय आहे. त्यामुळे आता ही शस्त्रक्रिया लांबवण्याची गरज नाही.

लाखो रुग्णांना होणार लाभ..
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहेत. त्यात गुडघे व खुबा बदलणे आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सांधेरोपण शस्त्रक्रियेचा जीवनदायी योजनेत समोवश झाल्याने, विशेषतः एसएमबीटीसारख्या सुसज्ज रुग्णालयास ही सेवा करण्याची संधी लाभल्याने याचा लाखो रुग्णांना लाभ होणार आहे.
