राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार? पुणतांबा गावात 23 मे रोजी होणार विशेष ग्रामसभा

नायक वृत्तसेवा, राहाता
महाराष्ट्रातील शेतकर्यांनी 2017 मध्ये ऐतिहासिक संप पुकारला होता. या संपाची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती. 16 दिवस हा संप चलला होता. पुणतांब्यात शेतकरी एकवटले होते. आता याच पुणतांब्यामध्ये शेतकर्यांची आणि विविध संघटनांची एक बैठक झाली. सरकारच्या धोरणांवर शेतकरी नाराज आहेत. खासकरून महाराष्ट्रात ऊस, कांदा आणि विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात लाखो टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. कांदा कवडीमोल झालाय. तर फळपिके फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. शेतकर्यांच्या प्रश्नी ऐतिहासिक अशा शेतकरी संपाची मशाल पेटवणार्या पुणतांबा (ता. राहाता) गावात पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ग्रामपंचायत समोर किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच शेतकर्यांची बैठक पार पडली. शेतकर्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आता येत्या सोमवारी (23 मे) रोजी पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेत शेतकरी आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरणार आहे. शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार का? की राज्यव्यापी आंदोलन करणार याबाबत ग्रामसभेत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या शेतकर्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेतेही एकत्र येत आहेत.

शेतकर्यांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात शिल्लक ऊसाला एकरी दोन लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. साखर कारखान्यात घातलेल्या ऊसाला प्रतीटन एक हजार अनुदान द्यावे, शेतकर्यांना सोलर पंपासाठी अनुदान द्यावे आणि शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. आयात-निर्यातीचे धोरण ठरवा, कांद्याला हभीभाव मिळाला पाहिजे, मागेल त्याला खत उपलब्ध झाले पाहिजे, कर्जमाफीची अंमलबजावणी झाली पाहिजे, दुधाला प्रतीलिटर दराचा प्रश्न सोडवावा, नाफेडमार्फत कांदा खरेदी केली जावी, कांद्याला प्रतीक्विंटल दोन हजार भाव द्यावा, ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपी लागू करावी, विहिरींसाठी पाच एकराची अट रद्द करावी आणि गव्हाची बंद केलेली निर्यात सुरू करावी, अशा मुद्द्यांवर शेतकर्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
