पिंपळगाव खांड पाणीप्रश्नी योग्य तोडगा काढू ः आ. डॉ. लहामटे पठारभाग पाणी योजनेवरुन राजकारण न करण्याचे केले आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
मुळा खोर्यातील पिंपळगाव खांड पाणीप्रश्नी लाभक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील असा संघर्ष लावणे योग्य नाही. याप्रश्नी कुणीही राजकारण न करता मतदारसंघातील सर्व नागरिक आपलेच असल्याने कुणावरही अन्याय होऊ न देता योग्य तो तोडगा काढू, अशी ग्वाही आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पिंपळगाव खांड धरणातील पाणी संगमनेर तालुक्यातील गावांना सोडू दिले जाणार नाही यावरून मुळा परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाल्याचे पसहावयास मिळत आहे. एकंदरीतच पाणीप्रश्न पेटल्याचे चित्र दिसत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील परंतु अकोले विधानसभा मतदारसंघातील 11 गावे व 27 वाड्यांसाठी 65 कोटींची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मंजूर करून आणली आणि तालुक्यात नवीन पाणीप्रश्नावर वाद उपस्थित झाला. या अनुषंगाने आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रथमच आपली भूमिका विषद केली आहे.
पिंपळगाव खांड धरणावर अवलंबून असलेले लाभधारक शेतकरी व नियोजित योजनेतील गावे यापैकी कोणावर अन्याय होऊ देणार नाही अशीच माझी भूमिका असेल. हा जो संघर्ष उभा केला आहे यावर सर्वांना विश्वासात घेऊन योग्य असा तोडगा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अकोले येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, विनय सावंत, मीनानाथ पांडे, पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समितीचे बी. जे. देशमुख, शरद चौधरी, कैलास शेळके यांची बुधवारी चर्चा झाली. त्यापूर्वी मंगळवारी सायंकाळी आमदार लहामटे यांनी आपल्या अकोले येथील संपर्क कार्यालयात माकप नेते अजित नवले, सीताराम गायकर, विनय सावंत, बी. जे. देशमुख यांच्याशी विचारविनिमय करून चर्चा केली. पिंपळगाव खांड पाण्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून लवकरच पिंपळगाव खांड पाणीप्रश्नी तोडगा काढणार असल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी व नियोजित प्रादेशिक नळ पाणी योजनेतील गावकर्यांनी कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी पडून हवालदिल होऊ नये. या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन आमदार डॉ. लहामटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.