साकूरमधील कान्हा ज्वेलर्सवर भरदुपारी दरोडा! हवेत गोळीबार करुन दहशत; लाखोंचा ऐवज घेवून पारनेच्या दिशेने..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निष्क्रिय पोलीस निरीक्षकांची श्रृंखला लाभलेल्या घारगाव पोलीस ठाण्यात दिगंबर भदाणे यांची नियुक्ति झाल्यापासून समाधानकारक स्थिती असल्याचे चित्र जाणवत असतानाच आज भरदुपारी त्यालाही छेद गेला. दुपारी दीडच्या सुमारास पठारभागाची समृद्ध बाजारपेठ समजल्या जाणार्‍या साकूर बसस्थानकाचा परिसर गर्दीने गजबजलेला असतानाच दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवित कान्हा ज्वेलर्सवर दरोडा घालून लाखों रुपयांचा ऐवज लुटून नेला. सदरचा प्रकार सुरु असताना आसपासच्या नागरिकांना दरोड्याची कुणकुण लागल्याने सदरील दुकानाजवळ गर्दीही जमा झाली होती, मात्र दरोडेखोरांनी त्याची कोणतीही तमा न बाळगता पिस्तुलातून हवेत गोळाबार करीत दहशत निर्माण केली. त्यामुळे बघ्यांची मोठी उपस्थिती असतानाही कोणीही दरोडेखोरांना रोखण्याची हिम्मत दाखवली नाही. या घटनेनंतर पाचही दरोडेखोर पारनेरच्या दिशेने सुसाट झाले असून घारगाव पोलिसांसह संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक त्यांच्या मागावर आहेत.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार आज (ता.11) भरदुपारी दीडच्या सुमारास साकूर बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या कान्हा ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात घडला. नेहमीप्रमाणे या दुकानचे मालक एका ग्राहकाशी बोलत असताना काचेचा दरवाजा लोटून आत शिरलेल्या आणि तोंड झाकलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील एकमेव ग्राहकाला खाली बसण्यास भाग पाडले. त्यानंतर दुसर्‍या दरोडेखोराने काऊंटरच्या आतील बाजूला जात शोकेसमध्ये ठेवलेल्या दागिन्यांच्या एक-एक पेट्या काढून समोरील बाजूस ठेवल्या, इतर दोघांनी त्यातील दागिने काढून पिशवीत भरले तर उर्वरीत दोघे दुकानाच्या दारात सुरक्षा म्हणून उभे राहीले.


दरोडेखोरांकडे बंदुक असल्याने सुवर्णकाराने अणि दुकानातील ग्राहकाने त्यांना कोणताही विरोध केला नाही. मात्र हा प्रकार सुरु असतानाच बाहेरील बाजूला असलेल्या काहींना दरोडे पडल्याची कल्पना आल्याने सदरील दुकानाच्या आजुबाजूला गर्दी जमा होवू लागली. त्यामुळे दरोडेखोरांनी आपला कार्यभाग उरकत तेथून पळ काढण्यासाठी कान्हा ज्वेलर्सच्या बाहेर पाऊल टाकताच समोर अनेकजण दिसू लागल्याने घाबरलेल्या एका दरोडेखोराने हवेत हात उंचावून बंदुकीसारख्या दिसणार्‍या हत्यारातून हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांना रोखण्याची कोणाचीही हिम्मत झाली नाही.


या घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे फौजफाट्यासह साकूरमध्ये दाखल झाले. दरोडेखोरे विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन पारनेरच्या दिशेने पसार झाल्याचे समजताच दोन्ही अधिकार्‍यांनी आपापल्या वाहनांसह त्यांचा पाठलाग सुरु केला आहे. वृत्त लिहेपर्यंत सदरील दरोडेखोर त्यांच्या हाती लागलेत की नाही याबाबत कोणतीही निश्‍चित माहिती हाती लागली नाही. मात्र भरदुपारी गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 113251

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *