मक्याची कणसे घेवून जाणारा टेम्पो उलटला! पुणे-नाशिक महामार्गावरील घटना; दोन जखमी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेवून जाणारा टेम्पो शुक्रवारी (ता.20) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उलटला आहे. यामध्ये दोघे जखमी झाले तर टेम्पो उलटल्याने कणसांच्या गोण्या महामार्गावर विखुरल्या होत्या.

या अपघाताबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती की, मालवाहतूक आयशर कंपनीचा टेम्पो चालक बाबासाहेब तातेराव बोडके, अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून 120 मक्याच्या कणसांच्या गोण्या घेवून संगमनेर मार्गे चाकणला जात होते. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले असता त्यावेळी टेम्पो उलटला. यामुळे कणसांच्या गोण्या महामार्गावर सर्वत्र विखुरल्या होत्या.

या घटनेची माहिती समजताच टोलनाक्याचे कर्मचारी विजय खामकर, पांडुरंग वाळे, नाना रहाणे यांच्यासह डोळासणे महामार्गाचे साहय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण ढोकरे, रामनाथ पुजारी, संजय मंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनला पाचारण करुन अपघातग्रस्त टेम्पो बाजूला घेण्यात आला. गेल्या चार-पाच दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असल्याने तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 116067

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *