नाटेगाव येथे संकल्प रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध भाजप कार्यकर्त्यानेही दिला पाठिंबा; जिल्ह्यात होतेय चर्चा


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी शासनाच्यावतीने विकसित भारत रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन स्क्रीनवर विविध विकासकामांची माहिती दिली जात आहे. मात्र, कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकर्‍यांनी या संकल्प रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध नोंदवत या रथाला माघारी पाठवल्याचा प्रकार घडला आहे.

नुकतेच केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क लावलं होतं. त्याचबरोबर मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे आरोप करत शेतकर्‍यांनी केंद्र शासनाच्या कामाची माहिती देणार्‍या या रथाला गावात प्रवेश करण्यास विरोध केला आहे. उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, केंद्र शासनाचं धोरण शेतकर्‍यांचं मरण अशाप्रकारच्या घोषणा शेतकर्‍यांनी दिल्या असून या शेतकर्‍यांमध्ये एका भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शेतकर्‍याने देखील सरकारला घरचा आहेर दिलाय. यावेळी शेतकरी खंडू मोरे, भरत मोरे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, एकनाथ सूर्यभान फापाळे, प्रभाकर मोरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

मोदी सरकार येऊन आज दहा वर्षाचा कालावधी होत असून मोदी सरकारने या बळीराजाला इतका मारणी घातलं की, २१ वेळेस कांद्याच्या भावाला मोदी व भाजप सरकार आडवे झालेले आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावून निर्यात बंदी करुन वेळोवेळी असे निर्णय घेऊन शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. आम्ही शेतकर्‍यांसाठी भरपूर काही करतो असे फक्त दाखवण्याचे कार्य या सरकारचे असून ‘बात्र्याच्या शेतात १२ अवतं अन् पाहायला गेलो तर एकही नव्हतं’ अशी गत या सरकारची असल्याची टीका नाटेगाव येथील शेतकरी एकनाथ फापाळे यांनी केली आहे.


सरकारी कर्मचार्‍यांचा वापर कशाला
शासकीय कोणत्याही कर्मचार्‍याला तुम्ही मोदींच्या प्रचाराला उतरवू नका. कारण ते पगार आमच्या पैशांतून घेत आहे. तुम्ही तुमच्या प्रचारासाठी खासगी माणसं नेमा, सरकारी कर्मचार्‍यांना या कामात अडकवण्याची गरज नाही, शासकीय काम थांबवून तुम्ही त्यांना असे काम करण्यास सांगत आहे हे योग्य नाही.
– प्रभाकर मोरे (शेतकरी-नाटेगाव)


सरकारी कर्मचार्‍यांच्या दृष्टीने सरकार चांगले निर्णय घेत असून शेतकर्‍यांच्या बाबतीत या सरकारचे निर्णय चुकीचे आहे असा आमचा सर्व शेतकर्‍यांचा समज आहे. अचानक कांदा निर्यात बंदी करण असे निर्णय शेतकर्‍यांच्या दृष्टीने चुकीचे वाटतात. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, परंतु आज शेतकर्‍यांनी संकल्प रथाला जो विरोध करत कांदा ओतला, मी त्यांच्यासोबत असून या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.
– गोरक्षनाथ मोरे (भाजप कार्यकर्ते तथा शेतकरी-नाटेगाव)

Visits: 118 Today: 2 Total: 1112404

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *