स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही डोक्यावरील हंडा उतरेना! शिंगणवाडीतील आदिवासींची पाण्यासाठी वणवण; लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांची अनास्था कारणीभूत
महेश पगारे, अकोले
आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाचा ढोल बडवत असले तरी अकोले तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही वीज, पाणी रस्ते यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी केवळ लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकार्यांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे.
अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील शिंगणवाडी येथे हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्याची तहान भागविणार्या भंडारदरा परिसरातील हा आदिवासी पाडा अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकारकडून डिजिटल इंडियाचा नारा देऊन देश महासत्ताक होण्याचे स्वप्न पाहत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही आदिवासी गावे विकासापासून कोसो दूर असल्याचेच पाहायला मिळत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन अभियान सुरू करुन प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. परंतु, शिंगणवाडीला सद्यस्थितीत साधे रस्ते व वीज देखील नाहीये. तेव्हा नळाद्वारे पाणी कधी मिळणार असा यक्षप्रश्न आहे.
या पाड्यावरील बायाबापडे व लहानगे दीड ते दोन किलोमीटरची डोंगरदर्यातून पायपीट करुन डोक्यावर हंडा घेऊन पिण्याचे पाणी वाहून आणतात. दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करायची आणि घरी आले की लगेच डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करायची. रात्रीच्या अंधारात चाचपडत जाऊन डोंगरावरील एका जलस्त्रोतावरुन पाणी आणण्याचा त्यांचा दिनक्रमच बनला आहे. या संघर्षमय वाटचालीत सरपटणार्या व हिंस्त्र प्राण्यांचा देखील सामना करावा लागतो.
शिंगणवाडीसह तालुक्यातील अनेक आदिवासी गावांतील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते यांची दयनीय अवस्था झालेली आहे. यासाठी केवळ लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्यांनी अनास्थाच कारणीभूत ठरत आहे. म्हणून आदिवासी बांधवांवर विकासापासून कोसो दूर राहण्याची वेळ येतेय. यावरुन शिक्षण, आरोग्य तसेच आवश्यक मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात नसल्याने आदिवासींच्या विकासाचे चित्र सध्यातरी कागदावरच राहिलेले दिसत आहे.
शासनाकडे आम्ही सतत वीज, पाणी याची मागणी करतोय. मात्र, आमच्या मागण्यांकडे कोणी लक्षच देत नाहीये. दूषित पाण्यामुळे आजारी पडतो. पण इंजेक्शन घेऊन पुन्हा रोजच्या कामाला लागतो. आमचं मागणं आता तरी मायबाप सरकारने ऐकावं.
– देव बुधा पोकळे (ग्रामस्थ)