संगमनेरातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! चालकासह डझनभर महाविद्यालयीन तरुणांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध अवैध धंद्यांचे आगार ठरत असलेल्या संगमनेर शहरात आता महाविद्यालयीन तरुणांना व्यसनाच्या दिशेने घेवून जाणारे उद्योगही राजरोसपणे सुरु होत असल्याचे रविवारी रात्री समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने गुंजाळवाडी शिवारातील कथीत ‘कॅफे हाऊस’वर छापा घालीत चालकासह दहाजणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात या सर्वांवर सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियम) अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सापडलेले बहुतेक हुक्काप्रेमी शहरातील उच्चभ्रु व सुखवस्तु कुटुंबातील महाविद्यालयीन तरुण असल्याने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई रविवारी (ता.15) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी रस्त्यावरील दि सिक्रेट पॅराडाईस कॅफे या ठिकाणावर करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तेथे छापा घातला असता सदर कॅफेच्या वरच्या मजल्यावर शासनाने बंदी घातलेला हुक्का पितांना दहा महाविद्यालयीन तरुण आढळले. तेथील सामानाची तपासणी केली असता पोलिसांना मानवी जीवितास धोका होऊ शकेल असे हुक्का पिण्याचे सामान व त्यात मिसळण्यासाठीचे वेगवेगळे फ्लेवर्स आढळून आल्याचे दाखल तक्रारीत म्हंटले आहे.

याप्रकरणी पो.कॉ.कानिफनाथ जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दि सिक्रेट पॅराडाईज कॅफेचा चालक पंकज सुभाष शिंदे याच्यासह शहरातील उच्चभ्रु व सुखवस्तु कुटुंबातील दहा महाविद्यालयीन तरुणांच्या विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियम) अधिनियमाच्या कलम 4 (अ), 21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या कारवाईत 38 हजार 850 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो.ना.सचिन उगले यांच्याकडे देण्यात आला आहे.

महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता सध्या चिंतेचा मोठा विषय ठरत असतांना यंत्रणांसह पालकांच्या जबाबदार्‍याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अर्थात सदर कारवाईमागे एकमेकांशी असलेली व्यावसायिक स्पर्धा कारणीभूत असल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली असून एका बड्या राजकीय व्यक्तिच्या धेडांनीच हा छापा घडवून आणल्याची चर्चा सुरु आहे. याचाच अर्थ कारवाई झालेले हुक्कापार्लर शहरात एकमेव नसून ते पोलिसांकडे दुर्लक्ष करुन सुरु करण्यात आल्याने सदरची कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत पोलिसांना अंमलीपदार्थ आढळून आलेले नाहीत.

Visits: 124 Today: 1 Total: 1426657

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *