संगमनेरातील गोवंशाचे मांस खेड व गंगापूर पोलिसांनी पकडले! संगमनेर पोलिसांचे दावे खोटे; कथित बंद असलेले कत्तलखाने राजरोस सुरुच असल्याचे उघड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर गेल्या वर्षी झालेल्या सर्वात मोठ्या कारवाईनंतर सदरचे कत्तलखाने आजपावेतो बंद असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात होते. मात्र पोलिसांचा हा दावा सपशेल खोटा ठरला असून संगमनेरातील कत्तलखान्यांमधून हजारों किलो गोवंशाच्या मांसाची तस्करी सुरुच असल्याचे दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस कारवायातून उघड झाले आहे. यातील पहिली कारवाई राजगुरुनगर (खेड) येथे तर दुसरी कारवाई औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही ठिकाणच्या पोलिसांनी मिळून एकूण 13 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदोली टोलनाक्यावर यातील पहिली कारवाई करण्यात आली. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी संशयावरुन संगमनेरहून मुंबईच्या दिशेने निघालेला टाटा कंपनीचा टेम्पो (क्र.एम. एच.17/बी. वा हीींिं://ी.वा/य. 7574) रोखला. वाहनातील दोघांकडे त्यांनी चौकशी केली असता ते उडावाउडवी करुन लागल्याने संबंधित गोरक्षकांनी याबाबत खेड पोलिसांना माहिती कळविली. त्यानुसार खेड पोलिसांनी टोलनाक्यावर जावून सदरील वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील बाजूस कांद्याच्या गोण्यांच्या खाली दडवलेले गोवंशाचे मांस आढळून आले.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यातील अंमलदार स्वप्नील लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी टेम्पोचा चालक सलीम अब्दुल कपडे (वय 45 रा.नालासोपारा, ठाणे) व अल्फराज लियाकत पठाण (वय 22, रा.नायकवाडपुरा, संगमनेर) या दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी वाहनात कांद्याच्या गोण्यांच्या खाली दडवून ठेवलेले 900 किलो गोवंशाचे मांस आणि टेम्पो असा एकूण 1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी खेड पोलिसांनी वरील दोघांवर भा.दं.वि. कलम 429, 34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5, 5(क), 9(अ) व भारतीय प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तर, दुसरी कारवाई मुंबईच्या विरुद्ध दिशेला औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दित करण्यात आली. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही तरुणांनी संशयावरुन आयशर कंपनीचा टेम्पो (क्र.एम. एच.17/डी. आय.2478) रोखला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंशाचे मांस असल्याचे तरुणांनी दिसल्याने त्यांनी वाहनातील दोन्ही इसमांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गदारोळात त्यातील एकजण पसार झाला, तर जमावाने मारहाण केल्याने दुसर्‍या इसमाचे डोके फुटून त्याच्या डोळ्यांनाही दुखापत झाली. याबाबतची माहीती मिळताच गंगापूरचे पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जमावाच्या तावडीतून त्या इसमाची सुटका करीत त्याला ताब्यात घेतले. यावेळी जमावाच्या संशयानुसार सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंशाचे मांसच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सदरचा टेम्पो जप्त करुन पोलीस ठाण्यात आणला. यावेळी ताब्यात घेतलेल्या इसमाची ओळख पटविली असता त्याने त्याचे नाव जाकीर खान नासीर खान (वय 48, रा.मोगलपुरा, संगमनेर) व पसार झालेल्या इसमाचे नाव रफीक उस्मान कुरेशी (रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे असल्याचे सांगत सदरचे गोवंशाचे मांस पसार आरोपीच्या मालकीचे असल्याची व ते घेवून दोघेही हैद्राबादला जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम 429, 34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 5, 5(क), 6 व 9(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत संगमनेरचा रहिवाशी असलेल्या जाकीर खान याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी टेम्पोत भरलेले तब्बल 4 हजार किलो गोवंशाचे मांस आणि टेम्पो असा एकूण 11 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दोन्ही कारवायांत खेड व गंगापूर पोलिसांनी एकूण चार जणांवर गुन्हे दाखल करीत त्यातील तिघांना अटक केली, तर एकजण पसार होण्यात यशस्वी ठरला. मागील वर्षी गांधी जयंतीच्या दिनी अहमदनगर पोलिसांनी संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर छापे घालीत 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 72 जिवंत जनावरे, वाहने व अन्य साहित्य असे एक कोटी पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी येथील कत्तलखाने पुन्हा सुरु होवू देणार नाही अशी वल्गनाही केली होती, त्यासाठी पोलीस ठाण्यात अतिरिक्त असलेल्या सरकारी वाहनाला दिवस-रात्र त्या भागात गस्ती घालण्याचे आदेश देत कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या परिसरात पोलीस तपासणी नाकाही सुरु केला होता.

या कारवाईनंतर संगमनेरातील हिंदुत्त्वादी संघटना आक्रमक झाल्या व त्यांनी कत्तलखान्यांना पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. आठ दिवसांत दोनवेळा झालेल्या या आंदोलनादरम्यान स्थानिक पोलिसांनी आपली चामडी वाचविण्यासाठी वरीलप्रमाणे कारवाई करीत असल्याचे सांगत वेळ मारुन नेली. तेव्हापासून संगमनेरातील कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याचा दावा संगमनेर शहर पोलिसांकडून केला जात होता. मात्र राजगुरुनगर (खेड) व गंगापूर (जि.औरंगाबाद) पोलिसांनी संगमनेरातील कत्तलखान्यांमधून मोठ्या प्रमाणात गोवंशाची वाहतूक अजुनही सुरुच असल्याचे उघड केल्याने संगमनेर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

Visits: 156 Today: 2 Total: 1103436

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *