दरेवाडीमध्ये शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
दरेवाडीमध्ये शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील दरेवाडी येथे शेततळ्यातील पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.26) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. संतोष लक्ष्मण मैड (वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत संतोष मैड हा तरूण आपल्या कुटूंबासोबत दरेवाडी येथे वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी त्याचे वडील व तो शेतातील कांद्याला फवारा मारण्यासाठी गेले होते. फवारा मारत असताना संतोष हा जवळच असलेल्या आपल्या शेततळ्यातून हंड्याने पाणी आणून देत होता. त्याचवेळी पाणी काढत असताना अचानक संतोषचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. बराच वेळ झाला तरी संतोष का येईना म्हणून वडील लक्ष्मण मैड हे शेततळ्यावर गेले. घटना बघताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे इतरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर शेततळ्यातून संतोषला बाहेर काढत औषध उपचारार्थ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात हलविले. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात पाठविला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घारगाव पोलिसांत शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, संतोषच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.