सुभाष खरबस यांच्या निधनाने अकोल्यात पोकळी! प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘बहुआयामी’ पुस्तकाचे लोकार्पण
नायक वृत्तसेवा, अकोले
कला, शिक्षण व पत्रकारिता या सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवत माणसे जोडलेले सुभाष खरबस यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या निधनाने अकोल्यात पोकळी निर्माण झाल्याची भावना विविध मान्यवरांनी शुक्रवारी (ता.6) व्यक्त केल्या.
खरबस यांचे गतवर्षी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे ‘बहुआयामी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अकोले येथे या पुस्तकाचे लोकार्पण माजी आमदार वैभव पिचड, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, दीपक महाराज देशमुख, कारभारी उगले, अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, डॉ. अजित नवले, मीनानाथ पांडे, कैलास वाकचौरे, शांताराम वाळुंज, प्रा. बबन महाले, अशोक आरोटे, जालिंदर वाकचौरे, विनय सावंत, सुरेश खांडगे, महेश नवले, पत्रकार विजय पोखरकर, सुनील गिते, गोरक्ष मदने, डॉ. सुनील शिंदे, डॉ. उमा कुलकर्णी, अॅड. वसंत मनकर, राजेंद्र गोडसे, नवलेवाडीचे सरपंच प्रा. विकास नवले, मच्छिंद्र धुमाळ, संजय कळमकर, बाळासाहेब नाईकवाडी, भास्कर तळेकर, सुनील मालुंजकर, प्राचार्य संपत धावडे (पुणे) यांच्या उपस्थितीत झाले.
प्रारंभी पुस्तकाच्या संपादक मंडळाच्यावतीने ज्येष्ठ संपादक सुधीर लंके यांनी पुस्तक निर्मितीमागील भावना विशद केली. संपादक मंडळातील सदस्य अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, लक्ष्मण आव्हाड, नितीन गोडसे, ललित छल्लारे, भाऊसाहेब कासार, सुनीता सुर्वे यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी खरबस परिवारातील आई अंजनाबाई खरबस, पत्नी गीतांजली खरबस, भाऊ रमेश खरबस व सर्व कुटुंबियांचे सांत्वन केले. सतीश पाचपुते यांनी सूत्रसंचालन केले. ललित छल्लारे यांनी आभार मानले.