साडेतीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी धनगंगा पतसंस्थेचे संचालक मंडळ दोषी! अध्यक्षांसह व्यवस्थापकाला दहा वर्ष तर चौदा संचालकांना दोन वर्षांची शिक्षा; शिपाई निर्दोष..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडीतील धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत पाच वर्षांपूर्वी झालेल्या 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संस्थेचे तत्कालीन चेअरमन रंगनाथ काशिनाथ काशिद व व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे या दोघांना थेट दोषी ठरवतांना दहा वर्ष तर उर्वरीत चौदा संचालकांना प्रत्येकी दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात संस्थेच्या शिपायाला निर्दोष सोडण्यात आले असून उर्वरीत तीन कर्मचार्यांसह सहा संचालक अद्यापही फरार असल्याने त्यांच्या शिक्षेचा निर्णय झालेला नाही. मोठ्या कालावधीनंतर संगमनेर तालुक्यातील आर्थिक संस्थेतील अपहार प्रकरणात संचालक मंडळाला शिक्षा लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतची हकिकत अशी की, घुलेवाडीतील धनगंगा पतसंस्थेत सचिन बजरंग कवडे हा 2006 सालापासून व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. त्याने 30 सप्टेंबर 2009 पासून आपल्या पदाचा दुरुपयोग करुन संस्थेतील संगणक प्रणालीचा गैर वापर करीत डे बुकच्या खोट्या व दिशाभूल करणार्या प्रिंट काढल्यानंतर कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी रोजकीर्दीस नोंदवून संस्थेच्या ठेवीदारांच्या नावाने बोगस कर्जप्रकरणं तयार केली, बोगस पावत्या तयार करुन त्यासह कर्जरोख्यांवर बनावट सह्या करुन रोख कर्ज काढले, ठेवीदारांच्या पावत्या नावे टाकून त्याची रक्कम स्वतःच्या, आपल्या मर्जीतल्या व इतर ठेवीदारांच्या नावे जमा करुन नंतर रकमा अदा केल्या, तसेच स्वतःच्या नावाने विनातारणी कर्ज नावे टाकून त्यास संचालक मंडळाची मंजुरी घेतली नाही.

ज्या पावत्यांवर ठेवतारण कर्ज आहे अशा व इतर ठेव पावत्या ठेवीदारांच्या विरहित संगणक प्रणालीतून डे बुक प्रिंट काढल्यानंतर कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी नावे टाकला. त्यातून 31 मार्च 2017 अखेर 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी संस्थेचे वैधानीक लेखापरिक्षक अजय राऊत यांनी केलेल्या लेखापरिक्षणातून ही गोष्ट समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत 17 ऑक्टोबर 2017 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संस्थेतील पाच कर्मचार्यांसह 20 संचालकांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला होता.

शहर पोलिसांनी त्यातील मुख्य सूत्रधार संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याच्यासह संचालक मंडळातील तत्कालीन चेअरमन रंगनाथ काशिनाथ काशिद, व्हा.चेअरमन किरण रामदास जाधव, शांताराम मुक्ताजी राऊत, संचालक मंडळातील सदस्य सर्वश्री आनंदा लहानु पानसरे, विक्रम बाजीराव गुंजाळ, प्रवीण छबु भावसार, राजेंद्र मल्लु गायकवाड, मच्छिंद्र कारभारी ढमाले, भिकाराम गोपीनाथ राऊत, अण्णासाहेब गंगाधर नवले, बाळासाहेब धर्माजी ढमाले, अशोक लहानु पानसरे, बाबासाहेब नाना राऊत व अलका अशोक काशिद यांना अटक केली, व्यवस्थापक कवडे वगळता उर्वरीत आरोपींची जामीनावर सुटकाही झाली होती.

संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाचे वकील अॅड.बी.जी.कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करीत अनेक पुरावे सादर केले. ते ग्राह्य धरुन न्यायालयाने संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याला भा.द.वी.कलम 409 खाली 10 वर्ष कारावास, तीन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 418 खाली तीन वर्ष कारावास, तीन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 467 खाली 10 वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 468 खाली 3 वर्षांचा कारावास, पाच हजार दंड, कलम 471 खाली 10 वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायद्याच्या कलम 3 नुसार दोन वर्षांचा कारावास, पाच हजार रुपये दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली.

संस्थेचे तत्कालीन चेअरमन रंगनाथ काशिनाथ काशिद यांना भा.द.वी.कलम 409 खाली 10 वर्ष कारावास, 5 हजारांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 467 खाली 10 वर्ष कारावास, पाच हजारांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याच्या कलम तीन नुसार दोन वर्ष कारावास, पाच हजार दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली. तर उर्वरीत चौदा संचालकांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायद्याच्या कलम तीन नुसार दोषी धरतांना संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी प्रत्येकी दोन वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील सहा संचालकांसह तीन कर्मचारी अद्यापही फरार असून त्यांच्या शिक्षेवर कोणताही निर्णय झाला नाही तर संस्थेचे शिपाई सोमनाथ भागाजी राऊत यांना या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आले आहे.

या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास तत्कालीन शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरुण परदेशी यांनी तर नंतरचा तपास अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अंबादास भुसारे यांनी केला होता. न्यायालयात कामकात पाहतांना अतिरीक्त सरकारी अभियोक्ता भानुदास कोल्हे यांना पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे यांनी काम पाहीले. या प्रकरणात संचालक मंडळातील महादु दगडू अरगडे, बेबी संजय सोनवणे, सुनंदा बाळासाहेब सातपुते, सचिन गोविंद काळे, नामदेव देवराम घोडे, जिजाबाई देवीदास पांडे यांच्यासह संस्थेचे क्लार्क सचिन सुकदेव सोनवणे, लेखनीस विनायक दामोदर कांडेकर व रोखपाल शहनाज मेहबुब सय्यद हे अद्याप फरार असल्याने त्यांच्या बाबतचा निर्णय झालेला नाही. या वृत्ताने जिल्ह्यातील पतसंस्था क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

