कोण होणार करोडपती; स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष भाग मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे होणार सहभागी

नायक वृत्तसेवा, नगर
स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे ‘कोण होणार करोडपती’ कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत. कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन समाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेला बाजपेयी व शिंदे हे या भागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

सयाजी शिंदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटक सृष्टी यातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर समाजसेवेसाठी सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत, अजूनही देत आहेत. मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्षे एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपट दरम्यानच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करत असलेला ‘कोण होणार करोडपती’ कर्मवीर विशेष भाग 14 ऑगस्ट, 2021 रोजी रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर पहायला मिळणार आहे.

Visits: 133 Today: 1 Total: 1108651

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *