एटीएम कार्डची अदलाबदल करून अडीच लाख रुपये काढले राहुरीमधील घटना; पोलिसांत दोघा भामट्यांविरोधात गुन्हा


नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील एका एटीएममध्ये दोन अज्ञात भामट्यांनी हातचलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर एटीएम कार्डवरून वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे अडीच लाख रुपये काढून घेतले. ही घटना 28 एप्रिल ते 2 मे या दरम्यान घडली आहे.

परसराम तुळशीराम साखरे (वय 45, रा.गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 28 एप्रिलला दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शहरातील बसस्थानक समोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांना दोन भामटे भेटले. त्यांनी बोलबच्चन करून माझे लक्ष विचलित केले आणि हातचलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली.

साखरे यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांना सचिन हरिभाऊ डहाळे नावाचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्या दोन भामट्यांनी 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान साखरे यांच्या एटीएम कार्डवरून वेगवेगळ्या ठिकाणांहून 2 लाख 54 हजार 498 रुपये काढून घेतले आणि माझी फसवणूक केली. हा प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावरून पोलिसांनी दोन अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल हे करीत आहेत.

Visits: 84 Today: 4 Total: 1114558

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *