राहुरी वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर म्हैसगाव येथे जप्त केलेल्या बारा हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील म्हैसगाव येथे वन विभागाने जप्त केलेला 12 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना 1 मे रोजी घडली. या घटनेमुळे वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे वन विभागाने मोटार, पत्रे, लोखंडी गल, फवारणी पंप व लाकडी बांबू असा सुमारे 12 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. 1 मे रोजी सायंकाळी 6 ते 2 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास म्हैसगाव येथील वन विभागाचा गट क्रमांक 130 येथील रोपवाटिकेतून 700 रुपये किंमतीचे जुने लोखंडी 7 पत्रे, 800 रुपयांचे लोखंडी अँगलचे 4 नग प्रत्येकी 20 फुटी असलेले, 1 हजार रुपयांचे लोखंडी अँगलचे 10 नग प्रत्येकी अँगल 10 फुटी असलेले, 5 हजार रुपयांची 5 एचपी इलेक्ट्रीक मोटर, 2 हजार रुपयांची 1 एचपी इलेक्ट्रीक मोटर, 2 हजार रुपयांचा चार्जिंग फवारणी पंप, 500 रुपयांचे लाकडी बांबू 10 नग प्रत्येकी 4 फूट असलेले असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.


या घटनेबाबत वन विभागातील कर्मचारी मदन नवनाथ गाडेकर यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या यावरून अज्ञात आरोपींविरोधात गु. र. नं. 370/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जानकीराम खेमनर हे करीत आहेत. दरम्यान, चोरीची घटना घडली तेव्हा वन विभागातील अधिकारी व कर्मचारी काय करत होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Visits: 152 Today: 1 Total: 1115922

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *