सततच्या हवामान बदलाचा भात शेतीला मोठा फटका अकोले तालुक्याच्या आदिवासी गावांतील शेतकरी चिंतेत

नायक वृत्तसेवा, अकोले
जागतिक तपमान वाढ व त्यामुळे निर्माण होणार्या समस्या आता थेट शेतीपर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यात सर्वात मोठी झळ पर्यावरण आणि शेतीला बसत आहे. त्याचाच एक भाग आपण चालू हंगामात अनुभवतो आहे. पावसाने दिलेला मोठा ताण व त्यामुळे भात व इतर पिके वेळेवर न लागल्याने खूप मोठी नुकसान शेतीमध्ये होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यातील आदिवासी गावांतील भात पिकावर मोठ्या प्रमाणात करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. यामध्ये भाताचे पाने करपून गेली आहेत व पूर्णपणे लालसर पाने होऊन गेली आहेत.

यावर्षी सुरुवातील मान्सूनने दमदार आगमन केले. यामुळे शेतकरी सुखावला होता. वेळेत भात रोपे टाकून शेतीचे नियोजन केले होते. भात रोपे उत्तमप्रकारे तयार झाली. परंतु मधल्या काळात सुमारे दोन महिने पावसाने दडी दिली व भात लागवडी कमालीच्या लांबल्या. उशिरा सुरू झालेल्या पावसाने लागणी तर पूर्ण झाल्या. परंतु बहुतेक भात पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. भात पिकावर कधी नाही एवढे त्याचे रस शोषण करणार्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांना वेळेत मार्गदर्शन व मदत मिळणे अपेक्षित आहे.

भात पिकामध्ये जाऊन फवारणी करणे काम जिकिरीचे आसते. भात पिकात फिरण्यास मुबलक जागा उपलब्ध नसते. त्यामुळे फवारणीचे काम कठीण होते. अशा परिस्थितीत शेतकरी कुठलीही फवारणी करण्यास असमर्थ ठरतो. कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेले ड्रोन तंत्रज्ञान अकोले तालुक्यात वापरले गेले पाहिजे. त्यासाठी विविध विकास यंत्रणांनी पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. ड्रोनच्या सहाय्याने भात शेती वाचवता येणे शक्य आहे व येत्या काळात तशा सुविधा गावोगावी निर्माण करणे अनिवार्य ठरणार आहे. याकडे सर्वच स्तरांतून लक्ष देणे अपेक्षित आहे. भात शेतीवरच आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. जर हा हंगामच वाया गेला तर वर्षभराची चिंता त्यांना सतावते. एकीकडे कोविडमुळे रोजगाराच्या संधी हिरावल्या आहेत. तर दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत ठरत आहे. यामुळे आदिवासी शेतकर्यांसह भात उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत.

