आश्वी बुद्रुकमध्ये तीन-चार ठिकाणी चोर्या पोलिसांत मात्र एकच गुन्हा दाखल; नागरिकांमधून आश्चर्य

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शनिवारी (ता.16) मध्यरात्री चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी घरफोड्या करत मोठा ऐवज चोरून नेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत एकच गुन्हा दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर इतरांनी गुन्हा दाखल करण्याचे का टाळले? हे अद्यापही कळू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री आश्वी पोलीस ठाण्यापासून पाचशे फुटाच्या अंतरावर भरवस्तीत चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी चोर्या करून मोठा ऐवज चोरून नेल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांत लहानबाई सटवा खेमनर यांनी एकमेव चोरीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये लहानबाई खेमनर शनिवारी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद क्रमांक 132/2022 नुसार भारतीय दंडसंहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान खेमनर यांच्या घराशेजारी असलेल्या तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी हाथ साफ केल्याची गावात चर्चा आहे. मात्र याठिकाणी झालेल्या चोर्यांची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोर्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
