देवस्थाने खुली करण्यासाठी भाजपचे मंगळवारी राज्यभर आंदोलन
देवस्थाने खुली करण्यासाठी भाजपचे मंगळवारी राज्यभर आंदोलन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यातील प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या मंगळवारी (ता.13) ठिकठिकाणी साधूसंत उपोषण करणार असून, त्यास भाजपचा पाठिंबा असे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य अतुल भोसले हे त्र्यंबकेश्वर येथील महंतांसोबत उपोषण करतील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील येणार आहेत. तर शिर्डी हे या आंदोलनाचे मुख्य केंद्र असेल असे पक्षाने जाहीर केले आहे.

मंदिरे उघडण्यासाठी पूर्वी केलेले घंटानाद आंदोलन केवळ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुरते मर्यादित होते. यावेळी साधूसंतांना मैदानात उतरवून भाजपने पाठिंबा द्यायचा, अशी रचना केली आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी मंदिरांवर अवलंबून असलेले छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही आंदोलनात सहभागी करून घेतले जाणार आहे. देशातील प्रमुख देवस्थानांत शिर्डीचा समावेश असल्याने येथील आंदोलनावर प्रदेश भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे म्हणाले, साईमंदीर बंद असल्याने, शिर्डीसह परिसरातील गावांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. छोट्या व्यावसायिकांनी स्थलांतर केले. तिरूपती देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने खबरदारी घेत मंदीर खुले केले. साईसंस्थानने तयारी केली; मात्र राज्य सरकार परवानगी देत नसल्याने पंचाईत झाली. तसेच पक्षाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे म्हणाले, साईमंदीर बंद असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सराला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

