अत्याचाराच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीवर पुन्हा अत्याचाराचा गुन्हा! संगमनेर शहर पोलिसांत ठरली दुर्मिळ घटना; फिर्यादीत गंभीर बाबी नोंदविल्याने प्रकरणाचे गुढ वाढले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी आधीच तुरुंगाची हवा खात असताना पुन्हा दुसर्या तरुणीने त्याच आरोपीविरोधात अत्याचाराची फिर्याद दिल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासह इतर तरुणींवरही अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पीडित तरुणीने फिर्यादीत नमूद केल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहर पोलीस या गुन्ह्यांचा कसा उलगडा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, एकाच महिन्यात एकाच आरोपीविरोधात दोनदा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याची ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, घुलेवाडी येथील विवाहितेवर ओळखीच्या बहाण्यातून वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानुसार पीडित विवाहितेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी उबेद मन्सूर पटेल (रा. साकूर, ता. संगमनेर) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल असून, सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे. अशातच कल्याण (जि.ठाणे) येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर पीडित तरुणीने शहर पोलिसांत धाव घेऊन संपूर्ण प्रकार कथन करत फिर्याद नोंदविली आहे.

त्यात म्हटले आहे की, आजीच्या गावाकडे आरोपी उबेद पटेल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर संपर्क क्रमांक घेऊन व्हाटसअॅप व कॉल करुन जवळीक वाढविली. याचा फायदा उठवत प्रेमाचे नाटक केले आणि 2018 मध्ये संगमनेरातील एका हॉटेलमध्ये बोलावून प्रेमाची कबुली दिली. तसेच माझ्या धर्माचा त्याग करुन तुझा धर्म स्वीकारेल असा विश्वास दिला. तु माझ्याशी लग्न कर, तुला आयुष्यभर खूष ठेवेल असे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यावर न थांबता त्याने 1 जानेवारी, 2019 रोजी संगमनेरातील एका हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी बोलावून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पुन्हा अशाचप्रकारे शरीरसंबंध ठेवण्याचा तगादा लावला.

दरम्यानच्या काळात सिन्नर (जि.नाशिक) येथील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने अर्धनग्न अवस्थेतील काही छायाचित्र काढले आणि ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यावेळी लग्नाला नकार दिल्याने त्याने गोड बोलण्यास सुरुवात केली. पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर 15 मार्च, 2019 रोजी बालेवाडी (जि.पुणे) येथील हॉटेलवर बोलावून पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून त्याची मजल वाढतच गेली आणि कल्याण येथील हॉटेलमध्येही दोन-तीनवेळा भेटून शरीरसंबंध ठेवले.

हा प्रकार इथेच न थांबता वाढतच गेला. मार्च 2020 ते जुलै 2020 मध्ये वॅग्नोर कार (क्र.एमएच.17, एझेड.7598) मध्येही शरीरसंबंध ठेवले. तसेच अहमदनगरमध्ये जुलै 2020 ते सप्टेंबर 2020 मध्ये टे्रडींग व्यवसाय शिकण्यास असतानाही अत्याचार केला. यानंतर मात्र आरोपीचा खरा चेहरा समोर आल्यानंतर 2021 मध्ये त्याचे इतर तरुणींसोबत अनैतिक संबंध असल्याचा भांडाफोड झाला. त्यांनाही लग्नाचे खोटे आमिषं दाखवून अत्याचार केल्याचे समजले. मग याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने वाद घातला आणि लग्न करण्यासही नकार दिला. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवे ठार मारील अशी धमकी देखील दिली. मात्र, त्याच्याविरोधात पोलिसांत जाऊन तक्रार देण्याचे टाळले होते. परंतु, त्याने मैत्रिणींना संपर्क करुन मी खालच्या जातीची आहे, तिचे लोक फार नालायक असतात अशी बदनामी केली. यामुळे संताप अनावर झाला.

याचबरोबर त्याच्यावर शहर पोलिसांत एका विवाहितेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. मग मात्र त्याच्याविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्णय घेत शहर पोलिसांत फिर्याद दिल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी आरोपी उबेद मन्सूर पटेल (रा. साकूर, ता. संगमनेर) याच्याविरोधात गुरनं.281/2022 भादंवि कलम 376(2) (एन), 506, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (डब्ल्यू) 3 (2) (5) 3 (2) (5 ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करीत आहे.

अत्याचाराच्या गुन्ह्यात आधीच तुरुंगात असलेल्या आरोपीवर पुन्हा एकाच महिन्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याची संगमनेर शहर पोलिसांत ही दुर्मिळ घटना घडली आहे. तसेच पीडित तरुणीने तिच्यावर झालेला अत्याचार कथन त्याने इतर तरुणींसोबतही असाच अत्याचार केल्याची गंभीर बाब फिर्यादीत नमूद केल्याचे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे पोलीस त्यादृष्टीने तपास करुन या प्रकरणाचा कसा छडा लावतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

