पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचे तात्काळ कर्ज वाटप करा!

पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचे तात्काळ कर्ज वाटप करा!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राहाता शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचे तात्काळ कर्ज वाटप करावे. या आशयाचे निवेदन नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने राहाता शहरातील सर्व बँकांना देण्यात आले.


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विजय मोगलेे यांच्या नेतृत्वाखाली राहाता शहरातील भारतीय स्टेट बँकचे व्यवस्थापक अनिकेत फले, यूनियन बँकचे अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना महामारीमुळे आठ महिन्यांपासून हातावर पोट असणारे फेरीवाले, भाजीपाला विक्रेते यांसह इतर विक्रेते मोठ्या आर्थिक संकटात आहे. या सर्वांसाठी दहा हजार रुपये केंद्र सरकारने कर्ज मंजूर केले आहे. नगर विकास विभागाकडून 17 जून रोजी या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करावे हे असे आदेश सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील छोट्या व्यावसायिकांना त्वरीत कर्ज वाटप करणे गरजेचे आहे.


दरम्यान, शिर्डी येथील साई मंदीर दर्शनासाठी बंद असल्यामुळे भाविकांची संख्या ही रोडावली आहे. त्यामुळे साईबाबांच्या शिर्डीमध्ये पेरू, डाळिंब इतर फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे अनेक फेरीवाले आहेत. हे सर्व सध्या अडचणीत आहेत. त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी आत्मनिर्भर योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या नियमानुसार आपल्या बँकेतून कर्जपुरवठा तातडीने करून व्यवसाय सुरू करण्याकरता कर्ज पुरवठा झाल्यास शहरातील भाजीपाला विक्रेते, पथ विक्रेते, छोटे व्यापारी प्रामाणिकपणे व नियमानुसार कर्जाचा परतावा करतील. तरी आपण या व्यवसायिकांना त्वरीत कर्ज पुरवठा करावा. अन्यथा सर्वसामान्य फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेते यांच्या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही क्षणी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष राजेश लुटे, उपतालुकाध्यक्ष गणेश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष विजय मोगलेे, उपतालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे, उपशहराध्यक्ष प्रसाद महाले, उपशहराध्यक्ष मनविसे अजिंक्य गाडेकर, गणेश गाडेकर, आदित्य घोडेकर आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 143 Today: 1 Total: 1848321

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *