यंदा तरुण मतदारांसह महिलांचा ‘कौल’ ठरणार निर्णायक! साडेसहा हजार नवीन मतदार; विखे-थोरात यांच्यातील संघर्षाचेही दर्शन घडणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीची तारिख जशी समीप येवू लागली आहे तशी प्रचारातील रंगतही वाढू लागली आहे. यावेळी संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात सलग नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्यासमोर महायुतीच्या अमोल खताळ यांचे आव्हान असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत संगमनेर मतदार संघात 18 ते 40 वयोगटातील तरुण आणि महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्या दृष्टीने थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री आणि महायुतीकडून माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतली असून प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली आहे. येणार्‍या दहा दिवसांत विविध वक्त्यांसह दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभांचेही आयोजन होणार आहे.


गेल्या निवडणुकीपासूनच राजकीय उलथापालथ अनुभवणार्‍या स्वतंत्र महाराष्ट्रातील चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवार निश्‍चित करताना सगळ्याच राजकीय पक्षांचा कस लागला होता. इतके सगळे घडल्यानंतरही अनेकांची नाराजी कायम राहिल्याने यावेळी राज्यात बंडखोरांचे अक्षरशः पिकं आले असून त्याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसणार आहे. एकीकडे बंडखोरांमुळे राज्यातील काही मतदारसंघ चर्चेत आलेले असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघ मात्र वेगळ्याच कारणांनी राज्याच्या केंद्रस्थानी आले आहे.


जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या विखे-पाटील आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्यासाठी नवा नाही. मात्र यावेळी दोन्ही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघाच्या सिमा ओलांडून एकमेकांवर कुरघोड्या केल्याने या दोघातील हा संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे. त्यातच पंधरवड्यापूर्वी धांदरफळ येथील डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या सभेत डॉ.जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर झाल्याने दोन राजकीय घराण्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यामुळे यावेळी थोरात विरुद्घ विखे-पाटील असा सामना रंगणार असल्याचीही स्थिती निर्माण झाली होती. मात्र अगदी अखेरच्या क्षणी विखे-पाटलांचे विश्‍वासू समजल्या जाणार्‍या अमोल खताळ यांची शिवसेनेत पाठवणी करुन सलग नवव्यावेळी निवडणूक लढवून इतिहास लिहिण्यास उत्सुक असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यासमोर त्यांना उमेदवारी दिली गेली आहे.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी विखे-पाटलांच्या राजकारणाचा बळी ठरलेल्या कोपरगावच्या कोल्हे परिवारातील विवेक कोल्हे यांना सोबत घेत सुरुवातीला राहाता तालुक्याची कामधेनू समजला जाणारा गणेश कारखाना विखे-पाटलांकडून हिसकावून घेतला. त्यानंतर श्रीसाईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीवरही त्यांनी आपला झेंडा फडकावून थेट विखे-पाटलांच्या किल्ल्यात जावून त्यांना उघड आव्हान दिले. इतक्यावरच न थांबता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांच्या पंखात बळ भरुन थेट शिर्डीतच राधाकृष्ण विखे-पाटलांसमोर तगडे आव्हान उभे केले. त्याचा परिणाम विखे-पाटलांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात रस वाढण्यात झाला असून यावेळची निवडणूक लक्ष्यवेधी ठरणार आहे.


एकीकडे जिल्ह्यातील बाराही मतदार संघांवर विखे-पाटील व थोरात यांच्यातील राजकीय संघर्षाची छाप पडण्याचा अंदाज असताना दुसरीकडे या निवडणुकीवर प्रभाव टाकणार्‍या घटकांचीही आता चर्चा सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने 2 लाख 87 हजार 227 मतदारांचा समावेश असलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात 18 ते 40 वयोगटातील तरुण मतदार आणि त्यासह जवळपास 48.66 टक्केे असलेल्या महिला मतदारांचा कौल यंदा निर्णायक ठरणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार संगमनेर मतदारसंघात पहिल्यांदाच मतदान करणार्‍या मतदारांची संख्या 6 हजार 302 असून 18 ते 30 वयोगटात 65 हजार 391 (22.77 टक्के) मतदार आहेत. तर, 30 ते 40 वयोगटात 64 हजार 14 (22.29 टक्के) मतदार आहेत. या दोन्ही घटकांची एकत्रित संख्या 1 लाख 29 हजार 405 (45 टक्के) इतकी आहे.


त्यासोबतच यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांचा कौलही खूप महत्त्वाचा ठरणार आहे. महायुती सरकारने अगदी शेवटच्यावेळी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीचे नेते आनंदात असले तरीही ही योजना भविष्यात सुरु राहील किंवा कसे याची कोणतीही विश्‍वासार्ह माहिती नसल्याने ही योजना विद्यमान सरकारला कितपत तारणार याबाबत साशंकता आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर संगमनेर मतदार संघातील 1 लाख 39 हजार 757 (48.66 टक्के) मतदार महिला असून त्यांच्या मतदानातूनच संगमनेरसह राज्याचाही निकाल लागणार लागणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक विखे-पाटील विरुद्ध थोरात अशी भासत असली तरीही त्याचा फैसला मात्र तरुण आणि महिला मतदारच करणार आहेत हे मात्र निश्‍चित.


अकोले व शिर्डी मतदारसंघात विभागलेल्या संगमनेर मतदारसंघात 2 लाख 87 हजार 227 एकूण मतदार असून त्यात 1 लाख 47 हजार 469 पुरुष, 1 लाख 39 हजार 757 महिला व एका तृतीयपंथीय मतदाराचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण 767 सैनिक मतदार असून त्यात 40 महिलांचा समावेश आहे. तालुक्याच्या विविध भागातील एकूण 288 मतदान केंद्रांद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार असून यावेळी 27 पडदानशीन, तीन आदर्श, प्रत्येकी एक महिला, दिव्यांग व युवा संचालित मतदान केंद्रही असणार आहेत.

Visits: 69 Today: 1 Total: 147802

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *