म्हसवंडी येथील डोंगराला आग; वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न अख्खी रात्र काढून काढली जागून; वन्यप्राणीही पळाले सैरभैर
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील म्हसवंडी येथील डोंगराला बुधवारी (ता.21) रात्री अचानक मोठी आग लागली. त्यानंतर ही आग विझविताना वन विभागाच्या कर्मचार्यांना शर्थीचे प्रयत्न करत अख्खी रात्र जागून काढली. तर या आगीमुळे वन्यप्राणी जीव वाचविण्यासाठी सैरभैर पळाल्याचे दृश्य दिसले.
बुधवारी सायंकाळी म्हसवंडी येथील डोंगराला आग लागल्याचे समजताच वन परिमंडलाधिकारी रामदास थेटे, वनरक्षक दिलीप उचाळे, सुजाता टेंबरे, बाळासाहेब वैराळ, दीपक वायाळ, दिनेश निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर फायर ब्लोअर मशिनच्या माध्यमातून ही आग विझविण्यात आली. ही आग विझविताना कर्मचार्यांची चांगलीच दमछाक झाली. तर दुसरीकडे आगीपासून बचाव करण्यासाठी दोन बिबटे सैरभैर पळाल्याचे त्यांना दिसले. अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग विझविण्यात कर्मचार्यांना यश आले. त्यानंतर पारनेर तालुक्यातील कातळवेडेच्या डोंगरवाडी येथील डोंगरालाही मोठी आग लागल्याची माहिती आली.
परंतु, ही आग आपल्या हद्दीत येवू नये वन विभागाच्या कर्मचार्यांनी आपला मोर्चा त्या घटनास्थळी वळविला आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या दोन्ही डोंगरांना लागलेल्या आगीचा फटका अनेक झाडांना बसला आहे. तर अनेक वन्यप्राणी सैरभैर पळाल्याचे दृश्य दिसले. गेल्या काही दिवसांपासून पठारभागातील अनेक डोंगरांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीमध्ये अनेक छोटी-मोठी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने डोंगर सध्या काळेभोर दिसत आहे.
म्हसवंडी येथील डोंगराला आग लागली तेव्हा वार्याचा वेगही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे काही शेतकर्यांना या आगीचा फटका बसला आहे. पण अशावेळी ठाकरवाडीतील नागरिकांनी आम्हांला आग विझविण्यासाठी मोठी मदत केली म्हणून ही आग लवकर आटोक्यात आली.
– रामदास थेटे (वन परिमंडलाधिकारी)