डाऊच खुर्द येथील नवीन तळ्याचे काम धिम्या गतीने सुरू सरपंच संजय गुरसळ यांच्यासह ग्रामस्थ ठेकेदार कंपनी विरोधात आक्रमक
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायतीचे पिण्याचे पाण्याचे तळे समृद्धी महामार्गात बाधित झाले असून या तळ्याच्या बदल्यात पर्यायी नवीन तळ्याचे काम धिम्या गतीने चालू असून सध्या ते बंद अवस्थेत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना हे काम बंद असल्याने पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार नाही. परिणामी गावाला पिण्याच्या पाण्याचा मोठा सामना करावा लागणार आहे. जर समृद्धी महामार्गाचा ठेका घेतलेल्या कंपनीने हे काम त्वरीत पूर्ण केले नाही तर जुन्या तळ्याला हात लावू देणार नाही, असा इशारा सरपंच संजय गुरसळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द पाणी पुरवठा योजनेचे तळे समृद्धी महामार्गात बाधित झाले असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सरपंच संजय गुरसळ व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सदाशिव लोखंडे यांच्यामार्फत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत या तळ्यासाठी 15 कोटीच्या वर निधी मंजूर करून घेतला. निधी मंजूर झाला पर्यायी जागाही उपलब्ध झाली. मात्र या तळ्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने दिरंगाई करत असून अजूनही कामात प्रगती दाखवली नाही. गायत्री कंपनीकडून अन्यत्र दोन-तीन ठेकेदाराकडे हे काम गेले आहे. सध्या या तळ्याचे काम बंद असून हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण झाले नाही तर पावसाळा सुरू झाल्यानंतर या कंपनीला काम करता येणार नाही. त्यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच उद्घाटनाची तयारीही करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे सध्या सुरू असलेले पाणी पुरवठा करणारे तळे केव्हाही बुजून समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा डाव ठेकेदार व कंपनीचा आहे. मात्र यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नसल्याचे सरपंच गुरसळ यांनी सांगितले. वेळप्रसंगी जर नवीन तळ्याचे काम पूर्ण झाले नाही तर जुन्या तळ्याला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांना सोबत घेऊन जलसमाधी घेण्याचा इशाराही सरपंच संजय गुरसळ यांनी दिला आहे.