संगमनेर तालुक्यात आजपासून भारनियमनाचा ‘झटका’! फिडरनिहाय दोन टप्प्यात होणार पुरवठा खंडीत; महावितरणकडून वेळापत्रक जाहीर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात विविध कारणांनी निर्माण झालेली विजेची तूट भरुन काढण्यासाठी अखेर महावितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना भारनियमनाचा झटका देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आजपासून दोन टप्प्यात दीड ते पाच तासांचे भारनियमन केले जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील 38 फिडरवरुन वेगवेगळ्या वेळेत केल्या जाणार्या भारनियमनाचे वेळापत्रकही जारी करण्यात आले असून संगमनेर शहर फिडरवरुन दोन टप्प्यात तीन तासांचे तर पाणी पुरवठा फिडरवरुन सव्वाचार तासांचे भारनियमन केले जाणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांच्या घामाच्या धारा वाढणार आहेत.
गेल्या पंधरवड्यापासून राज्यात कोळसा टंचाईच्या कारणाने औष्णिक वीज निर्मितीमध्ये घट झाली आहे. त्यातच यंदा उन्हाळ्याच्या झळा तीव्रतेने जाणवत असल्याने विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीला महावितरणकडून केवळ रात्रीच्यावेळी तातडीचे भारनियमन केले जात होते, मात्र अवघ्या चार दिवसांतच ते बंद झाल्याने व त्यानंतर जवळपास आठवडाभर विद्युत पुरवठा सुरुळीत राहील्याने राज्यासह जिल्ह्यात विजेचा तुटवडा नसल्याचे चित्र निर्माण झालेले असतांना बुधवारी सायंकाळी उशिराने महावितरणच्या ठाणे कार्यालयाकडून राज्यभरात भारनियमन करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
त्यानुसार संगमनेरच्या विभागीय वितरण कार्यालयाने संगमनेर तालुक्यातील 38 फिडरद्वारा मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंतच्या भारनियमनाचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यासाठी वीज वसुली व गळतीच्या प्रमाणानुसार ग्रुप तयार केले असून त्यानुसार दिड ते पाच तासांचे दोन टप्प्यात भारनियमन होणार आहे. अर्थात महावितरणकडून वेळापत्रक जारी झाले असले तरीही ज्या दिवशी बिजेची मागणी कमी असेल किंवा विजेचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल त्या दिवशी भारनियमन होणार नाही किंवा भारनियमानाचे तास कमी केले जाणार आहेत.
महावितरणकडून जारी करण्यात आलेल्या भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार ए व बी या फिडरवरुन भारनियमन होणार नाही. मात्र ए 1 व बी 1 पासूनच्या श्रेणीतील फिडरवरुन मात्र किमान दिड तास वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे. त्यानुसार संगमनेर शहरातील शहर फिडर डी 2 श्रेणीत गृहीत धरुन त्यावरुन दररोज सकाळी 10.30 ते 12 व दुपारी 3.30 ते 5 तर पाणी पुरवठा विभागाच्या फिडरची श्रेणी जी 1-बी गृहीत धरुन त्यावरुन पहाटे 4.30 ते 6.30 व रात्री 9.45 ते 12 यावेळेत भारनियमन होणार आहे. याशिवाय तालुक्यातील मांडवे उपकेंद्रावरुन सकाळी 6 ते 7.30, निमोण उपकेंद्राच्या पळसखेडे गावठाण फिडरवरुन दुपारी 3.30 ते 5 व आश्वी खुर्दच्या निमगाव जाळी फिडरवरुन सायंकाळी 5 ते 7 यावेळेत वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
सी ग्रुपमधील साकूर, निमोण उपकेंद्र अंतर्गत पिंपळे गावठाण व पद्मनगरच्या घुलेवाडी फिडरवरुन सकाळी 11 ते 12.30 व दुपारी 4 ते 5, पिंपरणे उपकेंद्राचे कणकापूर फिडर, धांदरफळचे निमज फिडर व पद्मनगरचे मार्केट यार्ड फिडर यावरुन दररोज सकाळी 10 ते 11 व दुपारी 2.30 ते 4, हिवरगाव पावसा येथील चंदनापुरी फिडरवरुन सकाळी 11 ते 1 व दुपारी 5 ते 6, संगमनेर शहर फिडरवरुन दररोज सकाळी 10.30 ते 12 व दुपारी 3.30 ते 5, कोकणगावच्या वडगावपान फिडरवरुन पहाटे 5 ते 7 व सकाळी 10.30 ते 12, कर्जुले पठारचे डोळासणे फिडर व राजापूर गावठाण फिडरवरुन पहाटे 4 ते 6 व दुपारी 12 ते 1.30, साकूरचे रणखांब फिडर, आश्वी बु. निमगाव जाळी फिडर, पिंपरणे सबस्टेशनचे रायते गावठाण व चिंचोली गुरवचे देवकौठे फिडरवरुन पहाटे 4.30 ते 6.30 व दुपारी 3 ते 5,
आश्वी खुर्दचे 11 के.व्ही.फिडर, कर्जुलेपठारचे जवळे बाळेश्वर फिडर, पिंपरणे उपकेंद्राचे अंभोरे गावठाण फिडर, पद्मनगरचे प्रवरा फिडर व पोखरी हवेलीच्या गावठाण फिडरवरुन दररोज पहाटे 2.30 ते 4.30 व सायंकाळी 6.45 ते रात्री 9, घारगावचे बोटा फिडरवरुन पहाटे 2.30 ते 4.45 व दुपारी 4.30 ते 6.45, कर्जुले पठारचे पिंपळगाव देपा फिडर, पेमगिरी फिडर, जवळे कडलगचे वडगाव लांडगा गावठाण फिडर व संगमनेरचे पाणी पुरवठा फिडरवरुन पहाटे 4.30 ते 6.30 व रात्री 9.45 ते 12, धांदरफळच्या सांगवी फिडरवरुन पहाटे 2.30 ते 4.45 व दुपारी 4.30 ते 6.45, साकूरच्या जांबुत फिडरवरुन मध्यरात्री 12.15 ते 2.30 व सायंकाळी 7.15 ते 9.30,
घारगाव फिडर, तळेगाव उपकेंद्राचे वडझरी गावठाण फिडर, घुलेवाडी औद्योगिक वसाहतीच्या मालदाड गावठाण फिडरवरुन मध्यरात्री 1 ते 2.30 व दुपारी 2 ते 4.30, कोणगावचे रहिमपूर फिडर व तळेगाव सबस्टेशनचे चिंचोली गावठाण पहाटे 4.30 ते 7 व रात्री 9.30 ते 12, आश्वी खुर्दचे चणेगाव-कनोली फिडर, वडगाव लांडगा येथील पिंपळगाव कोंझिरा फिडर व जवळे कडलगचे गावठाण फिडर वरुन दररोज पहाटे 2.30 ते 4.30 व दुपारी 1.30 ते 3.30 यावेळेत भारनियमन केले जाणार आहे. त्यामुळे ऐन उष्णतेच्या कालावधीत संगमनेर तालुक्यातील नागरिकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागणार आहेत.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यात भारनियमन नाही व होणार नाही अशा आशयाचे वक्तव्य केले होते, त्याचा दिलासा नागरीकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच वीज वितरण कंपनीच्या ठाणे कार्यालयाने संपूर्ण राज्यात भारनियमानाचे वेळापत्रक जारी करुन राज्यात 1.30 ते 5 तासांचे भारनियमन करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे मंत्रालय आणि वितरण कंपनी यांच्यातील समन्वयातील पोकळीही उघड झाली आहे.
आजपासून (ता.21) तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या भारनियमनात संगमनेर शहरातील पाच फिडरद्वारेही शहर व घुलेवाडी लगतच्या शहरीभागाचा विद्युत पुरवठा दिवसभरातून दोनवेळा खंडीत होणार आहे. त्यात पद्मनगरमधील उपकेंद्रातंर्गत मार्केट यार्ड फिडरवरुन सकाळी 10 ते 11 व दुपारी 2.30 ते 4 असे अडीच तास. प्रवरा फिडरद्वारे पहाटे 2.30 ते 4.30 व सायंकाळी 6.45 ते रात्री 9 असे सव्वाचार तास. संगमनेरच्या 132 के.व्ही.वीज उपकेंद्रातंर्गत शहर फिडरद्वारे सकाळी 10.30 ते 12 व दुपारी 3.30 ते 5 असे तीन तास तर पाणी पुरवठा (वॉटर वर्क्स) फिडरद्वारे पहाटे 4.30 ते 6.30 व रात्री 9.45 ते मध्यरात्री 12 पर्यंत असे सव्वाचार तासांचे भारनियमन सुरु करण्यात आले आहे.