मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाचे तांडव! घाटघरमध्ये विक्रमी दहा इंच पाऊस; भंडारदर्‍यातून बारा हजार युसेक विसर्ग..


नायक वृत्तसेवा, अकोले
मागील दीड महिन्यापासून जेमतेम स्वरुपात कोसळणार्‍या मान्सूनने गुरुवारी विशाखा नक्षत्रात धरणांच्या पाणलोटात अक्षरशः तांडव घातले. जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या एकट्या घाटघरमध्ये गेल्या चोवीस तासांत तब्बल २५६ मिलीमीटर (१० इंच) पाऊस कोसळला असून रतनवाडीत २४५ मिलीमीटर तर पांजर्‍यात १९९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळा खोर्‍यातील पावसालाही मोठा जोर चढला असून मुळा नदीने विक्राळ रुप धारण केले आहे. चालू हंगामात पहिल्यांदाच अवघ्या २४ तासांत भंडारदरा धरणात पाऊण टीएमसी पाण्याची आवक झाली असून गुरुवारी सायंकाळपासून धरणातून १२ हजार ११९ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे निळवंडे धरणाची पाणी पातळीही वेगाने वाढत असून आज सकाळी पाणीसाठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणाच्या विद्युतगृहातून प्रवरापात्रात ८०० क्युसेक पाणी सोडले जात असून पावसाचा जोर टिकून राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

बिपोरजॉय चक्रीवादळाने प्रवासात अडथळे निर्माण केल्याने राज्यात वेळेवर दाखल होण्याची शक्यता असलेला मान्सून लांबला. त्यानंतरही राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर काही भागात तुरळक शिडकावा असेच चित्र गेल्या दोन महिन्यांपासून बघायला मिळत होते. त्यातही पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांवर पावसाची अवकृपा झाल्याने आसपासच्या जिल्ह्यात मुसळधार तर या जिल्ह्यांमध्ये कोरडेठाक असे विरोधाभासी चित्रही दिसले. एरव्ही जिल्ह्यात पावसाची स्थिती कशीही असली तरीही मुळा व भंडारदरा धरणांचे पाणलोट मात्र ओलेचिंब असते. यंदाही त्यात बदल झाला नाही, मात्र या संपूर्ण कालावधीत पावसाला म्हणावा तसा जोरच नसल्याने पूर्वीच जवळजवळ निम्मे भरलेले हे दोन्ही प्रकल्प रडतखडत सर्वोच्च पातळीच्या दिशेने सरकत असताना आता गुरुवारपासून वाढलेल्या पावसाने धरणातील पाण्याची आवकही वाढवली आहे.

पंधरवड्यापूर्वी पाणलोटात पुनरागमन करणार्‍या पावसाची गती बुधवारी खालावली होती. मात्र स्वाती नक्षत्राच्या अस्तासह उगवलेल्या विशाखा नक्षत्राने पाणलोटावर जमलेल्या काळ्याकुट्ट ढगांमधील जलधारांना पोषक वातावरण निर्माण केल्याने गुरुवारी सकाळपासूनच घाटघर, रतनवाडी, उडदावणे, पांजरे, सांम्रद, कळसूबाईच्या शिखररांगासह मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगड, कोथळे, पाचनई, पेठेचीवाडी, कुमशेत, अंबित, शिरपुंजे, लहित, खडकी अशा सर्वदूर तुफान वेगात पाऊस कोसळला. त्याचा परिणाम जेमतेम पावसाने मरगळ आलेल्या ओढ्या-नाल्यांनी रौद्ररुप धारण करीत पुन्हा एकदा खळखळाट सुरु केला आणि धरणांच्या दिशेने झेपावणार्‍या नद्यांच्या पात्रातील पाणी किनार्‍याच्या मर्यादा ओलांडून धावू लागले.

भंडारदर्‍याच्या पाणलोटातील घाटघर, रतनवाडी व पांजर्‍यात पावसाला प्रचंड जोर चढला असून चालू हंगामात पहिल्यांदाच घाटघरमध्ये २५६ मिलीमीटर (१० इंच) तर रतनवाडीमध्ये २४५ मिलीमीटर (साडेनऊ इंच) इतका विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे. गुरुवापासून सुरु असलेल्या तुफान पावसाने भंडारदर्‍यातील पाण्याची आवक दुप्पट वेगाने वाढली असून धरणाच्या सुरक्षिततेसाठी काल सायंकाळपासून दोन्ही विद्युतगृहांच्या बोगद्यांसह सांडव्याद्वारे १२ हजार ११९ क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. गेल्या चोवीस तासांत धरणांत विक्रमी ७४१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातील ६८५ दशलक्ष घनफूट पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले तर अवघे ५६ दशलक्ष घनफूट पाणी धरणात साठवण्यात आले आहे. मुळा खोर्‍यातही सर्वत्र पावसाला जोर चढला असून प्रचंड विस्तारलेल्या पाणलोटातील असंख्य जलप्रपातांनी मुळा नदीचा प्रवाह ११ हजार ५८७ क्युसेकपर्यंत नेला आहे.

निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखररांगांवरही पावसाने धुवॉधार हजेरी लावली असून कृष्णवंती पुन्हा एकदा दुथडी झाली आहे. त्यामुळे वाकी जलाशयाच्या भिंतीवरील विसर्गही वाढला असून आज सकाळी ६ वाजता ५५६ क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. त्याशिवाय गुरुवारी सायंकाळपासून भंडारदर्‍यातूनही १२ हजारांहून अधिक विसर्ग सोडला गेल्याने आज दिवसभरात निळवंडेची पाणी पातळी विस्तारणार असल्याने सकाळी सहा वाजता धरणाच्या विद्युतगृहाच्या बोगद्याद्वारे ८०० क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत निळवंडे धरणात ५५० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली असून पाणीसाठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्रासह संगमनेर व अकोले तालुक्यातील दुष्काळी भागांना वरदान ठरलेल्या आढळा व भोजापूरच्या पाणलोटातही तुरळक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने या दोन्ही जलाशयांचे पाणीसाठे हलते आहेत. त्यातच आढळा खोर्‍यातील साखळी लघु पाटबंधारे प्रकल्पातंर्गत वरच्या भागातील पाडोशी (१४६ दशलक्ष घनफूट) व सांगवी (७३ दशलक्ष घनफूट) ही दोन्ही जलाशये अनुक्रमे मंगळवार व बुधवारी ओव्हरफ्लो झाल्याने आढळा धरणातील पाण्याचा मार्ग प्रशस्त झाला असून चालू हंगामात पहिल्यांदाच अवघ्या चोवीस तासांत आढळा धरणाच्या पाणीसाठ्यात ३७ दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडली आहे. आढळेच्या तुलनेत म्हाळुंगीच्या खोर्‍यात अत्यल्प पाऊस असला तरी गुरुवारच्या रिमझिम पावसाने या जलाशयाचा पाणीसाठा सात दशलक्ष घनफूट पाण्याने वाढवला आहे.

गेल्या दोन महिन्यात एकीकडे पाणलोटात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असताना लाभक्षेत्रातील बहुतेक तालुके मात्र पावसाच्या प्रतीक्षेत होते. गुरुवारच्या विशाखा नक्षत्राने पाणलोटासह लाभक्षेत्रातील वातावरणातही उत्साह भरला असून बहुतेक तालुयांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता.२७) जिल्ह्यात श्रीरामपूर येथे सर्वाधिक ४० मि.मी., अहमदनगर येथे ३७ मि.मी., अकोले व संगमनेर येथे प्रत्येकी १९ मि.मी., नेवासा येथे १७ मि.मी., राहुरीत १२ मि.मी. तर राहाता येथे सात मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. उशिराने का होईना पण पावसाने आता पाणलोटासह लाभक्षेत्रातही बरसायला सुरुवात केल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चोवीस तासांत पाणलोटात झालेला पाऊस, धरणांचे पाणीसाठे आणि विसर्ग : घाटघर २५६ मि.मी., रतनवाडी २४५ मि.मी., पांजरे १९९ मि.मी., भंडारदरा १६५ मि.मी., वाकी १२९ मि.मी., मुळा (धरण) २० मि.मी., निळवंडे १५ मि.मी., कोतूळ ०९ मि.मी. व आढळा ०९ मि.मी. जलसाठे : मुळा १५ हजार ३७२ दशलक्ष घनफूट (५९.१२ टक्के), भंडारदरा ९ हजार २७५ दशलक्ष घनफूट (८४.०२ टक्के), निळवंडे ५ हजार ५१ दशलक्ष घनफूट (६०.७० टक्के), आढळा ५९० दशलक्ष घनफूट (५५.६६ टक्के) व भोजापूर ८२ दशलक्ष घनफूट (२२.७१ टक्के). विसर्ग : मुळा नदी (कोतूळ) – ११ हजार ५८७ क्युसेक, भंडारदरा धरण ते निळवंडे धरण – ९ हजार ७२ क्युसेक, निळवंडे धरण ते प्रवरा नदी ८०० क्युसेक.


गुरुवारी पाणलोटात धूमशान माजवणार्‍या पावसाचा जोर आज सकाळच्या सत्रात काहीसा मंदावल्याने धरणात होणारी पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात भंडारदरा धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात कपात करुन सांडव्याद्वारे ९ हजार ७२ तर विद्युतगृहाद्वारे ८३५ असा एकूण ९ हजार ९०७ क्युसेकचा विसर्ग सध्या सुरु आहे. आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार दररोज दुपारच्या सत्रात पाणलोटातील पावसाला जोर चढत असल्याने दुपारनंतर विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा आज ८४ टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आला आहे.

Visits: 30 Today: 1 Total: 114583

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *