प्रत्येक गावात शेतकर्यांसाठी बीज बँक निर्माण व्हावी ः पद्मश्री पोपेरे राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे 183 आएएस अधिकार्यांना केले मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, अकोले
देशी बियाणे संवर्धित करून प्रत्येक गावात शेतकर्यांसाठी बीज बँक निर्माण करावी. यासाठी शासनाने अधिकाधिक प्रयत्न करावेत. याचबरोबर प्रशासनात काम करताना जनतेचे प्रश्न समजावून घेत काम करा, असे आवाहन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले.

मसुरी (उत्तराखंड) येथे असलेल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकार्यांच्या फेस वनमधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अधिकार्यांना मार्गदर्शन केले. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या 183 अधिकार्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात संसदीय सदस्य विवेक तनखा आणि संध्या रे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

नव्यानेच निवडण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकार्यांना प्रशिक्षण देताना पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला. मातीचे होत असलेले प्रदूषण व त्यामध्ये शेती करताना मिसळले जात असलेले रासायनिक घटक यांचा मानवी आरोग्यास धोका पोहोचत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच यातून मोठ्या प्रमाणात शेतीची उत्पादन क्षमता घटत असल्याचे निरीक्षण नोंदवून शेतकर्यांना वेळीच सावध करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यासाठी प्रत्येकाच्या आहारात सकस आणि विषमुक्त अन्न जावं यासाठी प्रयत्न व्हावेत. देशी बियाणे वापरून प्रत्येक घरासमोर परसबाग उभारली जावी. शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी शेतकर्यांना मार्गदर्शन आणि मदत केली व्हावी, असे आवाहन पद्मश्री पोपेरे यांनी केले.

छत्तीसगड येथून आलेल्या गोपालरत्न पुरस्कार विजेत्या माधवी जंगेल यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना दूध व्यवसाय आणि रोजगारनिर्मिती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. महिलांच्या माध्यमातून दूध व्यवसाय व प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू करुन हजारो लोकांना रोजगार देणार्या माधवी जंगेल या छत्तीसगडमध्ये आदर्श ठरल्या आहेत. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड कॅडरचे 36 आयएएस अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून सुमारे पंधरा आयएएस अधिकारी निवडले गेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र कॅडरमध्ये असलेले सुहास गाडे, मृणाली जोशी, विनायक महामुनी, निवृत्ती आव्हाड, आदित्य जीवने या अधिकार्यांनी राहीबाई पोपेरे यांचे मार्गदर्शन व विचार समजून घेतले. त्यांच्यासह इतर 36 आयएएस अधिकारी या प्रशिक्षण वर्गात उपस्थित होते. एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा राहीबाई पोपेरे यांचे दर्शन घेत या सर्व प्रशिक्षणार्थींनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले. तरुण अधिकारी श्रीकांत वीसपुते यांनी या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले. बायफ संस्थेचे सुरू असलेले विविध उपक्रम व बीज बँक यांचे महत्व बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी समजावून दिले. तसेच द्विभाषिकाची भूमिकाही पार पाडली. आयएएस प्रशिक्षणामध्ये अशाप्रकारे शेती आणि शेतकर्यांचे विचार ऐकून घेण्याचा अनोखा उपक्रम यावेळी राबविला जात असल्याबद्दल सर्वांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
