साहेब..! रस्त्यांचा अन् आरोग्याचा प्रश्न मार्गी लावा..!जिल्हाधिकाऱ्यांपुढे नांदुरच्या ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा..

राजू नरवडे, घारगाव
साहेब… वर्षानुवर्षांपासून आमच्या येथील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. लोकसहभागातून काहींनी पैसे जमवून रस्त्याचे काम केले आहे. आरोग्य उपकेंद्र आहे, पण त्यासाठी कर्मचारीच नाही. अशा एक ना अनेक व्यथांचा पाढाच पठार भागावरील नांदुर खंदरमाळ येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यां समोर वाचला. अतिवृष्टीमुळे पठार भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आज तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदूर येथील भेटीदरम्यान तेथील ग्रामस्थांनी नुकसानीसह आपल्या समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. यावेळी आवश्यक त्या कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नांदुर येथील नुकसानग्रस्त परिसराची नूतन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी साहेब ये-जा करण्यासाठी साधा रस्त्याही राहिला नाही. सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा व्यथा मांडल्या. यानंतर माजी उपसरपंच गणेश सुपेकर म्हणाले, नांदुर गावातंर्गत असलेल्या बावपठार, मोरेवाडी, खैरदरा आदि वाड्या-वस्त्यांचे रस्ते अनेक वर्षांपासून खराब झाले आहेत. त्यात पावसाने वाट लागली आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही रस्त्यांची कामे झाली नाहीत. त्याचबरोबर गावात आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे, पण ते काहीच उपयोगाचे नाही. कर्मचाऱ्यांअभावी ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आमचे खूप हाल होतात.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील संपूर्ण रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे त्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल, याची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र या परिसरासाठी काय चांगलं करता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नागरिकांच्याही समस्या आहेत. त्यासाठी शासनाकडून आलेल्या निधीचा समान तत्वांवर वापर करावा लागतो, त्याचाही विचार करावा लागेल. इजीएसमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आहे. त्यामधून आपल्याला कामे करता येतील का याचीही चाचपणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नांदूर येथील आरोग्य उपकेंद्रासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आपण स्वतः जिल्हा परिषदेच्या कार्यकारी प्रमुखांची चर्चा करून मार्ग काढू. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे आपले प्रश्न सोडवणे आमचे कर्तव्य आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने जे जे चांगले करणे शक्य आहे, ते ते पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी गावकऱ्यांशी बोलताना दिले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

