तांभेरेत बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्यास जमावाकडून धक्काबुक्की तेरा जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील तांभेरे येथे वाद निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, मंगळवारी (ता.12) तेथील एका जमावाने झेंडा उभा केला. या घटनेला पोलीस पथकाने मज्जाव केला असता जमावाकडून एका पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 13 जणांवर राहुरी पोलिसांत ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी तांभेरे येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वाद मिटल्यानंतर त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परंतु, मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तेथील एका जमावाने तांभेरे येथे झेंडा उभा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलीस पथकाकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. त्यावेळी जमावाकडून पोलीस पथकाला कारवाई करण्यास मज्जाव करण्यात आला. त्याचवेळी हवालदार ज्ञानदेव गर्जे यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. त्यामुळे स्वप्नील भारत तांबे, प्रसाद सुधाकर तांबे, शुभम अंतोन तांबे, चंद्रकांत गोरख तांबे, वैभव बाजीराव चोकर, संजय सोन्याबापू कांबळे, दीपक दिनकर तांबे, मार्तंड माधव तांबे, राजू आनंदा तांबे, अशोक बाबुराव तांबे, अक्षय अशोक तांबे, अजित पोपट तांबे, दादासाहेब ऊर्फ दाविद प्रल्हाद कांबळे या तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हवालदार ज्ञानदेव गर्जे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
