अमृत जवान अभियानाचा अहमदनगर पॅटर्न आता राज्यभर राबविणार! जिल्हाधिकार्यांची संकल्पना; आजी-माजी सैनिकांसाठी सुरू आहे पथदर्शी उपक्रम..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
निस्वार्थभावाने भारतीय सीमांचे रक्षण करणार्या आणि प्रसंगी प्राणांची आहुती देणार्या आजी-माजी सैनिकांना आपल्या गृह जिल्ह्यात सन्मान मिळावा यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अभिनव संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी 7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल या 75 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ‘अमृत जवान अभियान’ राबविले. या अभियानाचा जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा लाभ होत आहे. या पथदर्शी अभियानाची दखल घेत राज्य सरकारने येत्या महाराष्ट्र दिनापासून संपूर्ण राज्यात हा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यभर अहमदनगर पॅटर्नची चर्चा होत आहे.
या अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये माजी सैनिक, शहीद जवान व सध्या देशाच्या सेवेत कार्यरत असलेल्या जवानांची विविध कामे प्रलंबित असतात. यात प्रामुख्याने महसूल विभागाकडील फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पूनर्वसनाबाबतच्या अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड यासारख्या कामांसाठी एकतर या जवानांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यासोबतच पोलीस प्रशासनाकडील विविध तक्रारी अथवा जवानांच्या समस्या, समाजकंटकांकडून त्यांना होणारा त्रास, जमीन, जमिनींच्या हद्दी, पाणी यावरुन होणारे फौजदारी स्वरुपाचे वाद, ग्रामविकास विभागाकडील विविध योजना, ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी, कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे प्रस्ताव, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाकडील परवाने, तसेच इतर अनेक शासकीय विभागांकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेऊन माजी सैनिक, शहीद जवान व सध्या देशसेवेत असलेल्या जवानांचे प्रश्न पहिल्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी या विशेष अभियानाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.
जिल्ह्यात सुमारे पंधरा हजारांहून अधिक माजी सैनिक असून सैनिकांच्या विधवा पत्नींची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. कर्तव्य बजावतांना वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या वीरत्नींची संख्या पन्नास आहे. एकंदरीत या सगळ्यांना मिळून आजी-माजी, मृत्यू पावलेले व शहीद झालेल्या सैनिकांवर अवलंबून असलेल्या सदस्यांची एकूण संख्या पन्नास हजारांहून अधिक आहे. याशिवाय भारतीय भूदल, वायुदल व नौदलात सध्या कार्यरत असलेल्या जवानांची संख्याही मोठी आहे. सीमेवर कर्तव्य बजावत असल्याने अशा जवानांना आपल्या प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात जाणे शक्य होत नाही व त्याचा पाठपुरावाही घेता येत नाही. त्यामुळे त्यांची असंख्य कामे प्रलंबित असतात. यासर्व गोष्टींचा विचार करुन अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी हे अभिनव अभियान सुरु केले, त्याद्वारे जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा लाभ मिळाला आहे.
अहमदनगरच्या या पॅटर्नची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ते राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव शिवाजी गोरे यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहेे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आलेले ‘अमृत जवान अभियान’ आता संपूर्ण राज्यात राबविले जाणार आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून ते 15 जूनपर्यंतच्या कालावधीत रराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबवावे असे आदेश देण्यात आले आहेत. या अभियानातंर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसर्या सोमवारी अमृत जवान सन्मान दिन आयोजित करुन लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभागाचे प्रमुख व अर्जदार असलेल्या सैनिकांच्या उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेण्यात यावा तसेच सदर अभियानाच्या कालावधीत त्यांच्या प्रश्नांच्या निरसनासाठी विशेष मेळावे घेण्यात यावेत असे शासनाने यासंबंधी घेतलेल्या निर्णयात नमूद केले आहे. अहमदनगरच्या या पॅटर्नची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने जिल्ह्याचा मान वाढला असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
कोविड संक्रमणापासून चांगल्या कामाचा पायंडा निर्माण करणार्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या या संकल्पनेतून जिल्ह्यातील सुमारे 50 हजारांहून अधिक आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबियांना मोठा लाभ होत आहे. या अभियानाने जवानांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना पडणारे शासकीय कार्यालयांचे हेलपाटे वाचविले गेले असून हे अभियान राज्यासाठीच नव्हेतर संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरले आहे. त्यामुळे राज्यपातळीवर या अभियानाची पूर्तता झाल्यानंतर ते देशातही वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यातून अहमदनगरचा लौकीक वाढणार हे देखील निश्चित आहे.