‘लंपी’ नियंत्रणासाठी 552 गावांमध्ये पशुधनाचे लसीकरण ः डॉ. भोसले पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प; घाबरू नये जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन


नायक वृत्तसेवा, नगर
पशुधनावरील ‘लंपी’ चर्मरोग हद्दपार करण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन तत्पर असून जिल्ह्यातील 552 गावांतील 3 लाख पशुंचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 478 जनावरे बाधित आहेत. त्यापैकी 217 जनावरे बरी झालेली आहेत. शासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पशुंचा लंपी रोगाने मृत्यू झाल्यास पशुपालकांना जिल्हा नियोजन निधीमधून नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे. ‘लंपी’ चर्मरोग हा पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो तत्पर उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले केले आहे.

लंपी रोगासंदर्भात पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला. या ऑनलाईन बैठकीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी अहमदनगर जिल्ह्यात लंपी रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये, पशुसंवर्धन विभागाने शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करावे, शेतकर्‍यांमध्ये व लोकांमध्ये या रोगाबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होणार नाही. यासंदर्भात दक्षता घ्यावी. रोगाची योग्य माहिती पशुपालकांपर्यंत पोहचविण्यात यावी. अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात यापूर्वीही 2020-21 मध्ये 32 गावांमध्ये व 2021-22 मध्ये 27 गावात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. मात्र यामध्ये एकाही पशुधनाचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. पशुपालकांनी त्यांच्या बाधित पशुधनासाठी मोफत उपचार घ्यावेत. खासगी वा शासकीय पशुवैद्यकांनी या साथीच्या उपचारासाठी शुल्क आकारणी केल्यास किंवा याबाबत काही तक्रार असल्यास, विभागाच्या जिल्हा उपायुक्त किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 येथे तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले. संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 4 (1) नुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. ‘लंपी’ चर्मरोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकार्‍यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले.

Visits: 12 Today: 1 Total: 116775

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *