चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग! वाहनांना आग लागण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी (ता.28) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. आता उन्हाळा संपत आला असला तरी वाहनचालकांनी खबरदारी घेण्याची गरज या घटनेवरुन दिसून येत आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, टेम्पो ट्रॅव्हलर चालक विजय कोंडीबा काकडे (रा.शिर्डी) हे शिर्डी येथून दहा जणांना देवदर्शनासाठी भीमाशंकरला घेवून जात होते. शनिवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आले असता अचानक टेम्पो ट्रॅव्हलरने पेट घेतला. त्यामुळे ट्रॅव्हलरमधील सर्वजण घाबरून गेले आणि तत्काळ खाली उतरले. टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने रुद्रावतार धारण केला होता. त्यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाला होता. या आगीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेवरुन महामार्गावर वाहनांना आग लागण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसत असून, उन्हाळा संपत आला तरी आग लागत असल्याने वाहनचालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.