नगर-मनमाड महामार्गाचे काम कासवगतीने! एकेरी वाहतूक असल्याने अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ
नायक वृत्तसेवा, राहुरी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या चर्चेत असणार्या नगर-मनामाड महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रतीक्षेनंतर निधी मिळाला. मात्र, या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणारे आता कासावीस होताना दिसत आहेत. नगर-देहरे या दरम्यानचा प्रवास तर अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागत आहे.
नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. सरकारची उदासीनता आणि स्थानिक राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष, यामुळे या रस्त्याची साडेसाती काही केल्या संपत नव्हती. परिणामी, या मार्गावरील खड्ड्यांनी अनेक अपघातांत हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. स्थानिक नागरिकांसह साईभक्त आणि शनिभक्तांमधूनही या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, नगर ते शिर्डी या 80 किलोमीटर मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निधीतून नगर बाह्यवळण ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाचे मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्याचे ई-टेंडर काढून, त्याच्या कामाचेही वाटप झाले आहे. या कामामध्ये काही भागात सिमेंट काँक्रिट, काही भागात नूतनीकरण, तर काही भागात मजबुतीकरण केले जाणार आहे. पुण्याच्या ठेकेदार कंपनीने महामार्गाचे काम हाती घेतलेले आहे. 18 महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याच्या लेखी सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावरील खडतर प्रवास आता सुखरुप होईल, या अपेक्षेने नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता.
गेल्या आठ महिन्यांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवातही झाली. मात्र, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने विळद ते राहुरी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी, जागोजागी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तसेच, काही ठिकाणी छोटे मोठे अपघातही सुरू आहेत. यात, वाहनांचे नुकसान, तसेच अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ठेकेदाराने कामांना गती देताना जेथे खोदकाम केले आहे, ते अगोदर पूर्ण करण्याऐवजी, किंवा पर्यायी मार्ग खुला केलेला नाही. उलट जागोजागी खोदकाम करून वाहतुकीचा खेळखंडोबाच केला आहे. तसेच नगरकडून हे काम केले जात असताना, राहुरी विद्यापीठाकडून गॅस लाईनचे कामही वेगात सुरू आहे. त्यांनीही रस्त्यावर खोदकाम केले आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी सुरू असल्याने प्रवाशांना राहुरी ते नगर प्रवास करताना मोठी डोकेदुखी सहन करावी लागते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच महामार्गाचे काम संपेपर्यत गॅस लाईनचे काम बंद ठेवावे, अशीही मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
जीव मुठीत धरून प्रवास…
रात्रीच्या वेळी विळद ते राहुरी दरम्यान जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी एकेरी वाहतूक तर काही ठिकाणी नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. अनोळखी व्यक्ती दुचाकी अथवा चारचाकी वरून या रस्त्यावरून प्रवास करताना गोंधळ्याशिवाय राहत नाही. मध्येच रस्ता वळवण्यात आलेला आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. शिवाय रात्रीच्यावेळी वेगात होणारी जड वाहतूक यामुळे दुचाकी अथवा छोट्या वाहन चालकांची मोठी अडचण होताना दिसत आहे.