गतीमंद तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीच्या वडीलांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
गतीमंद तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीच्या वडीलांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरातील गतीमंद तरुणीवरील अत्याचार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी आरोपीच्या वडीलांनी संशयित व्यक्तीबद्दलची इत्यंभूत माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दिली असून, संशयिताची डीएनए व नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ब्राह्मणवाडा येथील 37 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली अकोले पोलिसांनी अजित रंगनाथ फलके यास अटक केली आहे. परंतु या प्रकरणाची संपूर्ण हकीगत वेगळी असून, 50 वर्षीय संशयित इसमाची नेहमी तरुणीच्या घरी उठबस असते. अनेकदा मुक्कामीही थांबतो. त्याच्या या संशयी स्वरुपाच्या वागण्याबाबत परिसरातील नागरिकांत उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, तरुणीला आठ महिन्यांपूर्वीच दिवस गेले होते. त्यावरुन तिला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले होते. तत्पूर्वी संशयित आणि पीडित तरुणीच्या आईने सदर प्रकार झाकून नेण्यासाठी गावठी औषधे देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी गांभीर्य आणि परिणाम विचारात घेऊन आळेफाटा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन माझ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा अकोले पोलिसांत वर्ग झाल्याने पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी असून आपण संशयिताची डीएनए व शास्त्रीय तौलनिक चाचणी (नार्को) करावी आणि सत्य उजेडात आणावे अशी मागणी पत्रातून केली आहे.

