विखेंना दणका; राहुरीच्या साखर कारखान्यावर राज्य सरकारची कारवाई! वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने केला वीज पुरवठा खंडीत; परिसर अंधारात

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्याकडून तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांचे वीजबिल थकीत होतं. वारंवार नोटीस देऊनही वीजबिल न भरल्यामुळे या कारखान्याचा वीज पुरवठा महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणार्या महावितरण कंपनीने खंडीत केला आहे. यामुळे कारखाना परिसर आणि कामगार वसाहतीत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
![]()
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी कारखान्यावर सत्ता आहे. हा कारखाना सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी यामध्ये लक्ष घालून काही काळ कारखाना चालविला. पण, अडथळे काही थांबले नाहीत. कामगारांची देण्याबरोबर वीजबिलही थकले. एक कोटी 17 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणार्या महावितरण कंपनीने यासाठी वारंवार नोटिसा पाठवल्या. मात्र, थकबाकी भरली गेली नाही. परिणामी कारखान्याचीही वीज तोडण्यात आली आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात हा कारखाना आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबांचे नाव कारखान्याला देण्यात आलेले आहे. तसेच त्यांचे वडील माजी खासदार डॉ. प्रसाद तनपुरे यांचेही या कारखान्यात मोठे योगदान होते. तनपुरे कुटुंबाची सत्ता या कारखान्यावर दीर्घकाळ होती.
