जीडीपी पेक्षा चीनला नमविल्याचा विचार करावा ः विखे

जीडीपी पेक्षा चीनला नमविल्याचा विचार करावा ः विखे
नायक वृत्तसेवा, राहाता
‘देशाचा विकासदर (जीडीपी) खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशतील सामान्य माणसाचा जो विचार केला, देशातील जनतेसाठीच त्यांचे जे अहोरात्र काम सुरू आहे, चीनसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही नमविण्याचे काम मोदींनी केले, याचा विचार केला पाहिजे,’ असे प्रतिपादन माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केले. जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणार्‍यांनी मागील सहा महिन्यांत राज्यातील जनतेला कोणती मदत केली, असा टोलाही त्यांनी लगावला.


शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आशा सेविकांना विखे यांच्या सहकार्याने कोविड विमा पॉलीसीचे संरक्षण देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहाच्या निमित्ताने या पॉलिसीचे वितरण करण्यात आले. त्यावेळी विखे बोलत होते. ‘कोरोना काळात ज्यांच्यावर जबाबदारी होती, तेच घरात बसल्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी कोणतेही काम राज्यात झाले नाही. याउलट पंतप्रधान मोदी यांनी संकटाच्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रिया राबविली. 20 लाख कोटी रुपयांची आत्मनिर्भर भारत योजना जाहीर करुन उद्योजकांपासून ते पथविक्रेत्यापर्यंत आणि शेतकर्‍यांपासून ते महिलांपर्यंत सर्वांना योजना देऊन हा देश पुन्हा आत्मविश्वासाने पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. देशाचा विकास दर खाली आला म्हणून मोदींच्या नावाने ओरडणार्‍यांनी मागील सहा महिन्यांत राज्यातील जनतेला कोणता दिलासा दिला? याचे आत्मपरीक्षण करावे. मोदींच्या निर्णयक्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला. त्यामुळेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात त्यांचा वाढदिवस आशा सेविकांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. आशा सेविकांना विमा पॉलिसीचे संरक्षण देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम यानिमित्ताने झाला,’ असेही विखे यांनी नमूद केले.

Visits: 19 Today: 2 Total: 115255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *