नेवाशात मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा; नागरिकांची होतेय गैरसोय शेवगाव तालुक्यातील नागरिकही खरेदीसाठी राहताहेत रांगेत उभे
नायक वृत्तसेवा, नेवासा
तहसील कार्यालयात मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची अडवणूक होत आहे. कोविड काळातही मुद्रांक खरेदीसाठी मोठी झुंबड पाहायला मिळते. चार पैकी एकाच मुद्रांक विक्रेत्यावर सध्या मुद्रांक विक्रीचा डोलारा उभा असून, ग्राहकांना चार-पाच तास रांगेत उभे रहावे लागत आहे.
नेवासा तहसील कार्यालयात चार परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहे. त्यातील दोन विक्रेते गेल्या वर्ष-दीड वर्षापासून कोषागार कार्यालयाकडेचे फिरकलेच नाहीत. इतर दोघांपैकी एक आठवडा-महिन्याभरातातून एकदा-दोन मुद्रांक विक्री करतो. तहसील कार्यालयात दररोज नेवासा व शेवगाव तालुक्यांतील शेकडो नागरिक मुद्रांक खरेदीसाठी येतात. केवळ एकाच मुद्रांक विक्रेता असल्याने मोठी गर्दी होते.
मुद्रांक विक्रेत्यांवर दुय्यम निबंधक कार्यालय व मुद्रांक जिल्हाधिकारी विभागाचे नियंत्रणच राहिले नसल्यानेच मुद्रांकांच्या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुद्रांकांबरोबरच वीस, दहा व पाच रुपयांची तिकिटेही मिळत नसल्याने नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे शेवगाव येथेही मुद्रांक मिळत नसल्याने तालुक्यातील पन्नास टक्के ग्राहक नेवाशाकडे मोर्चा वळवतात. तहसील कार्यालयात मुद्रांक खरेदीसाठीच्या रांगेत शेवगाव तालुक्यातील नागरिकही पहायला मिळत आहे.
मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांची अडवणूक होणार नाही, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना याबाबत सूचना देण्यात येतील.
– रूपेशकुमार सुराणा (तहसीलदार, नेवासा)
मुद्रांक खरेदीसाठी मागील दोन-तीन दिवसांपासून मी नेवशाला येतो. मात्र सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत खरेदीसाठी मोठी रांग असते. संबंधित विभागाने मुद्रांकांची टंचाई दूर करावी.
– राजेंद्र नागरे (जैनपूर, ता.नेवासा)