बोटा शाळेची ‘स्मार्ट शाळे’कडे वाटचाल शाळा प्रवेशात संगमनेर तालुक्यात ठरली दुसरी
नायक वृत्तसेवा, घारगाव
ग्रामस्थ व शिक्षक यांची एकी ज्ञानमंदिराला प्रगतीकडे घेऊन जाते, याची प्रचिती संगमनेर तालुक्यातील बोटा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘स्मार्ट शाळे’कडे झालेली वाटचाल बघून होते. सध्या इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या या शाळेत 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी इयत्ता पहिलीत 58 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. शाळा प्रवेशामध्ये संगमनेर तालुक्यात ही दुसर्या क्रमांकाची शाळा ठरली होती. शाळेची ‘सेमी इंग्रजी अंगणवाडी’ देखील सुरू आहे. ज्युनिअर आणि सिनिअर केजीमध्ये मिळून सध्या 45 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेतील शिक्षकांनी नुकतेच शाळेसाठी एचपी कंपनीचे प्रिंटर भेट दिले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी आपल्या निधीतून शाळेसाठी संगणक संच दिला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी डिसेंबर 2018 मध्ये शाळेचा दिमाखदार शताब्दी महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला होता. ह्या कार्यक्रमप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शाळेसाठी संगणक दिले. बारामती कॅटल फीड आणि प्रणाली सेल्स बोटा या संस्थांनी शाळेसाठी 400 वह्या नुकत्याच दिलेल्या आहेत. ग्रामस्थांकडून, पालकांकडून, माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी सदैव भरीव मदत मिळाली आहे. नुकताच एक 55 इंची स्मार्ट टीव्ही घेण्यात आला असून तो सुरू केला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसाठी सदैव मोठे काम केले आहे. अध्यक्ष गणेश शेळके आणि सर्व सदस्य यांनी गावातील सर्व विद्यार्थ्यांना ह्या सेमी इंग्रजी शाळेत दाखल होण्याबाबत पालकांकडे आग्रह धरला आहे. ह्या गावातून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या फारच अल्प आहे. लवकरच गावातील 100 टक्के विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत येण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक प्रयत्नशील आहोत. बोटा ग्रामपंचायतने देखील शाळेसाठी भरीव सहकार्य केले असून शाळेच्या सात वर्गखोल्यांची छत दुरुस्ती केली आहे. शाळेचे दरमहाचे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करत आहे. माजी सरपंच विकास शेळके, तत्कालीन उपसरपंच मुसळे, सर्व सदस्य, विद्यमान सरपंच सोनाली शेळके, उपसरपंच पांडू शेळके व सर्व सदस्यांनी शाळेसाठी सदैव सहकार्य करण्याचे ठरवले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास वाळुंज, भिकाजी शेळके, सुधीर शेळके, नितीन शेळके, सुखदेव शेळके, प्रताप गुंजाळ, मच्छिंद्र शेळके, शिवाजी शेळके, इब्राहिम शेख यांच्यासह सर्व मान्यवरांचे शाळेसाठी सदैव मार्गदर्शन व सहकार्य सुरू आहे.
जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास धोत्रे, केंद्रप्रमुख केसकर, मुख्याध्यापक मच्छिंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. शाळेतील कार्यरत शिक्षिका स्वाती भोर, अनिता आहेर, सुमती चौरे तसेच शिक्षक बाबुराव कदम, अण्णा शिंदे, बाबुराव सुपे आणि सेमी इंग्रजी शिक्षिका वनिता गाडेकर व प्रियंका मुसळे यांचे विद्यार्थ्यांसाठी सदैव मार्गदर्शन सुरू आहे. यामुळे शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल ग्रामस्थांकडून आणि पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.