अकोले दुय्यम निबंधक कार्यालयात सर्रासपणे लाचखोरी वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून पायबंद घालण्याची नागरिकांची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
जमीन खरेदी-विक्रीपासून, भाडेकरार, जुने दस्त मिळविण्यासाठी असंख्य कामांकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात जाणार्‍या नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांचा मलिदा मुक्तपणे लाटला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोलेतील दुय्यम निबंधक कार्यालयात होत आहे. अतिजोखमीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही त्रुटी काढून आपल्याला त्रास दिला जाईल, या भीतीपोटी अनेकजण तक्रार करायला धजावत नसल्याने या लाचखोरांचे चांगलेच फावत चालले आहे. त्यासाठी वरीष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच लक्ष घालून पायबंद घालण्याची गरज आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडले जातात. या व्यवहारांमधून शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळतो. त्याचबरोबर येथे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचार्‍यांचेही खिसे चांगलेच भरले जातात. कार्यालयाबाहेर कार्यरत असलेले त्यांचे निवडक ‘एजंट’ टपून बसलेले असतात. त्यांच्या मार्फत हा गोरखधंदा चालतो. याबाबत एका तक्रारदाराने सांगितले, की दुय्यम निबंधक कार्यालयात होणार्‍या प्रत्येक खरेदी-विक्रीच्या व्यवहारात किमान हजार रुपये अधिकारी व लिपीकांना द्यावे लागतात. गुंठेवारीनुसार जमिनीची खरेदी असेल, तर प्रत्येक गुंठ्यामागे 2 हजार रुपये घेतले जातात. कागदपत्रंची गुंतागुंत असेल तर तो व्यवहार कितीचा आहे त्यानुसार अधिकार्‍याच्या लाचेची रक्कम ठरते. बेकायदेशीर कामे करून देण्यासाठी घेतल्या जाणार्‍या लाचेची रक्कम तर खूपच प्रचंड आहे. तर त्यांना लाच न देता गुंतागुंतीची काम करणे शक्यच नाही. कारण पुन्हा काम घेऊन त्यांच्याकडे जायचे असते. त्यावेळी ते याचा वचपा काढणार हे गृहीत असते. त्यामुळे त्यांना पैसे द्यावेच लागतात.

सर्वसामान्य नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पै-पै जमा करून घर तसेच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असतात. मात्र, थल्या लाचखोरांना विरोध केला, तर कागदपत्रंमध्ये त्रुटी काढून आपल्याला नाहक त्रास देतील, या भीतीपोटी कुणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करायला धजावत नाही. विशेष म्हणजे या कार्यालयात वकिलांना दररोजच त्यांच्याकडे काम घेऊन जायचे असते; त्यामुळे त्यांच्या वाटेला जाणो ते टाळतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचखोरी चांगलीच फोफावली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, कंत्राटी कामगारांच्या बदल्या कराव्यात, आदी मागण्या नागरिकांतून होत असताना हा प्रकार वेळीच बंद न झाल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाच्या निषेधार्थ उपोषणास बसण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य दलितमित्र प्रकाश साळवे यांनी दिला आहे.

Visits: 157 Today: 1 Total: 1600923

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *