श्रीरामपूरमध्ये श्रीराम नवमी उत्सवाची जय्यत तयारी रमजानमुळे उरुस शरीफ साध्या पध्दतीने साजरा होणार
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गेल्या दोन वर्षापासून श्रीराम नवमी यात्रेवर करोना महामारीचे सावट असल्याने यात्रा होऊ शकली नाही. मात्र यावर्षी संपूर्ण नियम शिथिल झाल्यामुळे श्रीराम नवमी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी यात्रा समिती व श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहेत. त्यादूष्टीने श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रेची जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र शहरात आहे. मात्र रमजानचा पवित्र महिना व उपवास सुरू असल्याने उरुस शरीफ साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे.
हिंदू-मुस्लीम धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले हजरत सय्यदशहा कादरी बाबांचा 92 उरुस कालपासून सुरू झाला आहे. संदलच्या रात्री साडेदहा वाजता डावखर बाबा यांची मानाची चादर तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हजरत सय्यदशहा कादरी बाबांच्या मजारीवर चढविण्यात आली. यावेळी उरुस समितीचे सदस्य उपस्थित होते. शुक्रवारी (ता.8) व शनिवारी उरुस शरीफचा कार्यक्रम होणार आहे. उरुस शरीफच्या रात्री दर्गाह परिसरात धार्मिक मिलाद पठण होणार आहे.
हजरत सय्यदशहा कादरी बाबांचा दर्गाह 350 वर्षे पुरातन आहे. याठिकाणी सर्वधर्मिय भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. हजरत सय्यदशहा कादरी बाबा उरुसाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी श्रीराम प्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त 93 वी जंगी यात्रा भरणार आहे. रविवारी (ता.10) दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार असून यानिमित्त भजन व कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यादिवशी सकाळपासून श्रीरामांची झेंडा मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील विविध मंडळे, संस्था, श्रीरामपूर तहसील कचेरी, तालुका व शहर पोलीस ठाण्यातून झेंडा मिरवणूक निघणार आहे.
तसेच सायंकाळी 6 वाजता रथातून श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यादरम्यान सुशोभित दारुकाम होणार आहे. सोमवारी (ता.11) सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरीक सत्कार, सायंकाळी 6 वाजता श्रीशनि देवाची प्रतिमा मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी भारतातील ख्यातनाम मल्लांचा कुस्त्यांचा हगामा होणार आहे, असे विविध कार्यक्रम होणार आहे. मेनरोडवर काही दुकाने थाटली जात असून थत्ते मैदानावर पाळणे व विविध खेळण्यांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच खवय्यांसह मोठ्या प्रमाणावर करमणुकीचे खेळही दाखविण्यात येणार आहे. तरी श्रीरामपूर शहर तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा व रामनवमी उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन श्रीराम यात्रा समिती, श्रीराम मंदिर विश्वस्त, पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने केले आहे.