सोनकडा पाझर तलाव लाभक्षेत्रात विहीर खोदण्यास शेतकर्यांचा विरोध जिल्हाधिकार्यांसह स्थानिक पोलीस निरीक्षकांना शेतकर्यांच्यावतीने निवेदन
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील चास गावच्या सोनकडा पाझर तलाव लाभक्षेत्रामध्ये विहीर खोदण्यास वा कुठल्याही प्रकारचे खोदकाम करण्यास स्थानिक लाभार्थी शेतकर्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबदचे निवेदन भाऊसाहेब नानाभाऊ दुरगुडे व इतर लाभधारक शेतकर्यांनी जिल्हाधिकारी, पाटबंधारे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
सोनकडा पाझर तलाव हा गावातील शेतकर्यांसाठी वरदान मानला जातो. यामुळे भूजल पातळी वाढण्यास फायदा होत असल्याने भर उन्हाळ्यातही शेतीला पाण्याची कमतरता भासत नाही. मुळानदीतील वागळ्याचा डोह या पाझर तलावामुळे आटत नाही, असे गावातील शेतकरी सांगतात. याच लाभक्षेत्रातील भूगर्भात जर खोदकाम केले तर लाभार्थी शेतकर्यांना भविष्यात पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो. मात्र तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये राजेंद्र कारभारी दुर्गुडे व जालिंदर अशोक दुरगुडे यांनी विहिरीचे खोदकाम काही दिवसांपूर्वी चालू केले आहे. याच्या परिणामांची कल्पना आल्याने लाभार्थी शेतकर्यांनी याला विरोध केला असता, सदर इसमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या विहिरीचे काम तात्पुरते बंद असून भविष्यात ते सार्वजनिक पाझर तलावाच्या लाभक्षेत्रात विहिरीचे खोदकाम करू शकतात अशी शंका लाभार्थी शेतकर्यांना आहे.
यापुढे चास गावच्या सोनकडा पाझर तलाव परिसरात बोअर व विहीर खोदणे तसेच कुठल्याही प्रकारचे खोदकाम करण्यात येऊ नये व संबंधित इसमांना शासकीय पातळीवरून समज देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर प्रभाकर भाऊ दुरगुडे, गणपत भाऊ दुरगुडे, संतोष रभाजी दुरगुडे, राजाराम रामभाऊ दुरगुडे, बापू रामभाऊ शेळके, शंकर शिवाजी शेळके, विलास तुकाराम शेळके, भाऊसाहेब मुरलीधर गोडसे, बाळासाहेब नानाभाऊ दुरगुडे, बबन बन्सी गोडसे आदिंच्या सह्या आहेत.