रिकामटेकड्या दोन तरुणांचा उद्योग आला त्यांच्याच अंगलट लष्करी बॉम्ब प्रकरणी पारनेर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नगर
रिकामटेकड्या दोन तरुणांनी केलेला उद्योग त्यांच्याच अंगलट आला आहे. या उद्योगाने लष्करासह पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला आणि त्यातील एकास ताब्यात घेऊन दोघांविरोधात लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढवळपुरी (ता. पारनेर) येथील अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी हे दोघे गावाशेजारी असलेल्या के. के. रेंज या लष्कराच्या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या हद्दीत फिरण्यासाठी गेले होते. या प्रशिक्षण केंद्रात रणगाड्यातून मिस फायर झालेला एक जिवंत बॉम्ब पडला होता. या दोघांनी हा बॉम्ब उचलून घराकडे घेऊन आले. बॉम्ब कोठे ठेवायचा, असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. त्यांनी शेतामध्ये खोल खड्डा खोदून हा बॉम्ब पुरून ठेवला. गावातील काही ग्रामस्थांनी हे पाहिले.

काही जागरूक ग्रामस्थांनी ही माहिती पारनेर पोलिसांना दिली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणाची खात्री करून लष्करी अधिकार्‍यांना माहिती दिली. लष्करी अधिकारी, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचे संयुक्त पथक ढवळपुरी गावात दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने संबंधित शेतात जाऊन अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने बॉम्बचा शोध घेतला. तो जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा बॉम्ब नष्ट केला. याबाबत लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यूवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गांगर्डे पुढील तपास करीत आहेत.

बॉम्बमुळे अनेकांचा मृत्यू..
लष्कराच्या के. के. रेंज रणगाडा प्रशिक्षण केंद्रातून बॉम्बच्या धातूचे अवशेष काही जण चोरून आणतात. काही वेळेस जिवंत बॉम्ब सुद्धा सापडतात. जिवंत बॉम्ब हाताळताना यापूर्वी अनेकांचा मृत्यू झाला आहे. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या घटनांमधून बोध घेतला जात नाही. लष्करी हद्दीत सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश नाही. तरीही काहीजण बेकायदेशीरपणे या भागात घुसखोरी करतात.

Visits: 78 Today: 1 Total: 1111954

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *