संगमनेरच्या बेशिस्तीने आणखी एका तरुणाचा बळी! नगररस्त्यावर भीषण अपघात; डंपरखाली सापडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भल्या सकाळी मोपेडवरुन जाणार्‍या गृहिणीचा अपघात होवून त्यात त्यांचा बळी जाण्याची घटना ताजी असतानाच संगमनेरातून पुन्हा एकदा वेदनादायी वार्ता येवून धडकली आहे. या घटनेत दुचाकीवरुन जाणारे तिघे तरुण डंपरखाली सापल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरीत दोघे किरकोळ जखमी झाले. विजय उर्फ बंटी केणेकर (रा.रंगारगल्ली) असे अपघातात ठर झालेल्या तरुणाचे नाव असून तो दिवेकर गॅस एजन्सीमध्ये वितरण कर्मचारी म्हणून कार्यरत होता.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.29) दुपारी चारच्या सुमारास नगररस्त्यावरील अलका फ्रूट कॉर्नरजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार अतिशय रहदारीच्या या रस्त्यावर खासगी वाहतूकदार भररस्त्यातच प्रवाशांची चढ-उतर करीत असल्याने या भागात नेहमीच धोकादायक वाहतूक असते. त्यातच जवळच असलेल्या ज्ञानमाता विद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळा व महाविद्यालय सुटताना या रस्त्यावर नेहमीच अपघाताची भीती असते. आजवर अशा अनेक घटनांमध्ये निष्पाप विद्यार्थ्यांसह नागरिकांचाही बळी गेला आहे.


आज दुपारीही असाच प्रकार समोर आला. मयत बंटी केणेकर आपल्या अन्य दोन मित्रांसोबत दुचाकीवरुन नगर रस्त्यावरुन नवीन नगररोडकडे वळण घेत असताना सदरचा अपघात घडल्याचे समजते. यावेळी भररस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांमुळे अंदाज चुकल्याने केणेकर याच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागून ते तिघेही खाली पडले. दुर्दैवाने या घटनेत विजय उर्फ बंटी केणेकर हा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन्ही मित्र बालंबाल बचावले, त्या दोघांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.


या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली, मात्र बचाव करण्यासारखे काही नसल्याने तातडीने आलेल्या रुग्णवाहिकेत मयत केणेकरचा मृतदेह पाठवावा लागला. या घटनेनंतर बराचवेळी नगरकडून पुण्याकडे जाणार्‍या महामार्गावर दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ती सुरळीत करतांना पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. या घटनेने गेल्याच आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडलेल्या अपघाताच्या आठवणीही ताजा झाल्या असून त्या घटनेत एका निष्पाप गृहिणीला आपला जीव गमवावा लागला होता.

Visits: 128 Today: 1 Total: 1104974

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *